Delhi malviya nagar college girl attack with iron rod outside kamla nehru college park

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi College Girl Murder:  गेल्या 24 तासात दोन हत्यांनी राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. दिल्लीचा उच्चभ्रू परिसर असलेल्या मालवीय नगरात (Malviya Nagar) भरदिवसा एका मुलीची हत्या (Murder) करण्यात आली. त्याआधी दिल्लीतल्या डाबरी परिसरात एका बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवीय नगरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये (Kamla Nehru College) शिकणारी 22-23 वर्षांची मुलीवर आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर मार लागल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी फरार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. कॉलेज आणि आसपासच्या परिसरात पोलीस चौकशी करत आहेत. मृत मुलीचं कोणाबरोबर वैर होतं का, प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली आहे का, या दिशेने तपास सुरु आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले जात आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आपल्या मित्राबरोबर कॉलेजच्या पार्कत आली होती. त्याचवेळी तिच्यावर कोणीतरी लोखंडी रॉडने हल्ला केला. या ठिकाणी कॉलेजमधले तरुण-तरुणी फिरायला येत असतात. 

महिला आयोगाने घेतली दखल
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 24 तासात दोन महिलांच्या हत्या झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा पुन्हा ऐरणीवर आला असल्यां ट्विट स्वाती मालिवाल यांनी केलं आहे. याआधी दिल्लीत एका महिलेची तिच्या घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच मालविय नगरात कॉलेज तरुणीची हत्या झाली. दिल्ली महिलांसाठी खूप असुरक्षित झाली असून पेपरमध्ये केवळ मुलींची नावं बदलत आहेत, पण गुन्हे थांबलेले नाहीत असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलंय. 

 

महिलेची गोळी झाडून हत्या
राजधानी दिल्लीत गुरुवारी एका महिलेची गोळी झाडू हत्या करण्यात आली. महिलेच्या हत्येनंतर आरोपीनेही गोळी झाडत आत्महत्या केली. आरोपी आणि मृत महिला एकमेकांना ओळखत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत महिलेचं नाव रेनू गोयल असं असून ती 42 वर्षांची होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पायी आला होता आणि त्याने रेनू गोयल यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तिथून तो फरार झाला. आरोपीचं नाव आशिष असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तपास करत आशिषचं घर गाठलं. पण घराच्या टेरेसवर आशिषने स्व:तला गोळी झाडत आत्महत्या केली होती. 

मृत रेनू गोयल आणि आरोपी आशिष एकाच जिममध्ये जात होते, तिथेच त्यांची ओळख झाली. मृत रेनूचा पती प्रॉपर्टी डिलर आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

Related posts