3 दिवस ती लिफ्टमधून ओरडत, किंकाळ्या फोडत मदत मागत होती; अखेर 32 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लिफ्टमध्ये अडकून एका 32 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणी तब्बल 3 दिवस लिफ्टमध्ये अडकलेली होती. तरुणी लिफ्टमधून ओरडून ओरडून मदतीसाठी याचना करत होती. पण कोणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही, आणि अत्यंत दुर्दैवीपणे तिला जीव गमवावा लागला. कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही आणि तीन दिवसांनी तरुणीने आपले प्राण सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, वीज गेल्याने लिफ्ट 9 व्या मजल्यावर बंद पडली होती. यावेळी तरुणी आतमध्येच अडकली होती. 

उज्बेकिस्तानच्या ताशकंद येथे ही घटना घडली आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तीन मुलांची आई असलेली 32 वर्षीय ओल्गा लियोन्टीवा डिलिव्हरी ड्रायव्हरचं काम करते. गेल्या आठवड्यात सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी ती एका इमारतीत गेली होती. इमारतीची लिफ्ट खराबी असल्याची तिला काहीच कल्पना नव्हती. यानंतर ओल्गा जेव्हा लिफ्टमध्ये गेली तेव्हा ती अडकली. दुसरीकडे लाईटही गेली होती. 

लाईट गेल्यानंतर नवव्या माळ्यावर लिफ्टचा दरवाजा लॉक झाला आणि ओल्गा आतमध्ये अडकली. तीन दिवस ती आतमध्येच अडकून होती. तिने मदतीसाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही तिला आवाज ऐकू आला नाही. अखेर लिफ्टमध्ये अडकून ओल्गाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

दुसरीकडे ओल्गा घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी ओल्गा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना ओल्गा या इमारतीत आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सीसीटीव्ही पाहिलं असता ओल्गा इमारतीच्या लिफ्टमध्ये जाताना दिसत होती, पण बाहेर पडताना दिसली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी लिफ्ट उघडून पाहिली असता त्यात ओल्गाचा मृतदेह पडलेला होता. 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज गेल्याने लिफ्टमधील अलार्म सिस्टम बंद झालं होतं. नवव्या माळ्यावर कोणालाच ओल्गाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला नाही. अखेर गुदमरुन तिला आपला जीव गमवावा लागला. 

पोलिसांनी याप्रकरणी इमारतीच्या सोसायटीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असतानाही इतके दिवस ती दुरुस्त करण्यात आली नव्हती. याच निष्काळजीपणामुळे ओल्गाला जीव गमवावा लागला असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

त्याचवेळी, प्रादेशिक विद्युत नेटवर्क्सच्या प्रवक्त्याने ओल्गाच्या मृत्यूच्या वेळी इमारतीमध्ये वीज कापली गेली नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूचा संबंध वीजपुरवठा खंडित होण्याशी जोडू नये असं म्हटलं आहे. पोलीस याप्रकरणी सध्या अधिक तपास करत आहेत. 

Related posts