RPF जवान चेतन सिंहच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले “त्याच्या मेंदूत रक्ताची…”

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Express) गोळीबार करत चौघांची हत्या केल्याप्रकरणी आरपीएफ जवान चेतन सिंह (Chetan Singh) याला अटक करण्यात आली असून, रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे रेल्वे मंत्रालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, चेतन सिंहचं मानसिक आरोग्य तपासलं जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रेल्वे मंत्रालय संपूर्ण घटनेची सविस्तरपणे चौकशी करणार आहे. यादरम्यान त्याच्या कुटुंबाने धक्कादायक खुलासा केला आहे. चेतन सिंह हा तणावात होता आणि त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ सापडली होती अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे. 

चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार करत चौघांची हत्या केली. यामध्ये तीन प्रवासी होते. तरसंच सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना यांनाही त्याने गोळी घालून ठार केलं. दरम्यान या घटनेनंतर काही राजकीय नेत्यांनी ट्वीट करत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. पण रेल्वे मंत्रालयाने हा आरोप फेटाळला आहे. 

इंडिया टुडेने चेतन सिंहच्या कुटुंबाशी बातचीत केली असता त्यांनी काही मोठे खुलासे केले. चेतन सिंह हा चिंताग्रस्त आणि सतत तणावाखाली असायचा अशी माहिती कुटुंबाने दिली आहे. 

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणारा RPF जवान चेतन सिंहबाबत मोठा निर्णय

 

चेतन सिंहच्या वर्तवणुकीबद्दल सांगताना त्याच्या वहिनीने माहिती दिली की, “फार काळापासून त्याची तब्बेत खराब होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. तसंच औषधंही सुरु होती. त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती”.

दरम्यान चेतनला रागासंबंधी काही समस्या होती का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी माहिती दिली की, “त्याला रागांसंबंधी काही समस्या नव्हती. पण तो नेहमी चिंताग्रस्त असायचा. तसंच सतत तणावाखाली असे. तो कुटुंबापासून दूर राहत असल्याने वेळेवर औषध घ्यायचा की नाही याबद्दल माहिती मिळण्याची काहीच शक्यता नव्हती”.

चेतनला वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली होती. त्याचा भाऊ लोकेश हा मथुरामध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, चेतन सिंह हा त्यांच्याच घरात वास्तव्यास होता. त्याचे भावाच्या मुलांशीही चांगले संबंध होते. 

“चेतन सिंह कधी भांडत नव्हता, किंवा त्यात पडत नव्हता. वडिलांच्या निधनानंतर गेल्या 14 वर्षांपासून तो रेल्वेत काम करत होता. त्याची कधीही त्याच्या सहकाऱ्यांशी भांडणं झाली नव्हती,” अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.

ट्रेनमध्ये नेमकं काय झालं?

ट्रेनमध्ये चढल्यानंतर अर्ध्या तासाने चेतनला बरं वाटू लागलं नव्हतं. चेतनला पुढील स्थानकावर उतरायचं होतं. पण मीना हे त्याला शिफ्ट संपण्यासाठी अजून दोन तास शिल्लक असल्याचं सांगत होते. कंट्रोल रुममधील अधिकाऱ्यांनीही चेतनला आपले कामाचे तास पूर्ण कर आणि नंतर मुंबईत उपचार घे असं सांगितलं. यामुळे तो चिडला आणि भांडू लागला. यानंतर त्याने आपल्या एका सहकाऱ्याचा गळा दाबवण्याचाही प्रयत्न केला. यानंतर त्याने गोळीबार करत सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना आणि तीन प्रवाशांची हत्या केली. 

Related posts