( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ram Mandir Ayodhya: अयोध्यात निर्माण होत असलेल्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये भाविकांसाठी मंदिर खुले होण्याची शक्यता आहे. भगवान रामाचे भक्त सत्य प्रकाश शर्मा यांनी जगातील सर्वात हस्तनिर्मित कुलूप तयार केले आहे. या कुलूपाचे वजन 400 किलो म्हणजेच 4 क्विंटल इतके आहे. हे कुलूप बनवण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत केली आहे. सत्य प्रकाश शर्मा हे अलीगढचे रहिवासी आहे.
अलीगढचे सत्यप्रकाश शर्मा यांनी तयार केलेले 400 किलो वजन असलेले हे कुलूप यावर्षाच्या अखेरीस राम मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येईल. श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरासाठी मोठ्या संख्येने काहीना काही उपहार येत आहेत. आता या कुलूपाचा उपयोग कुठे करता येईल, हे नंतर ठरवण्यात येईल.
सत्य प्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंबीय एक दशकाहून अधिक काळापासून हस्तनिर्मित कुलूप बनवण्याचा व्यवसाय करतात. ते स्वतः 45 वर्षांपासून अलीगढ येथे कुलूप बनवण्याचे काम करत आहेत. अलीगढला ‘कुलूपांची नगरी’ असंही म्हटलं जातं.
सत्य प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराची भव्यता लक्षात घेऊन चार फूटांची चावी असलेले भव्यदिव्य कुलूप बनवले आहे. हे कुलूप 10 फूट उंच, 4.5 फूट लांब आणि 9.5 इंच जाडीला आहे. सत्य प्रकाश यांच्या पत्नीनेही हे कुलूप तयार करण्यास मदत केली आहे.
सत्य प्रकाश शर्मा यांच्या पत्नी रुक्मणी म्हणाल्या की, ‘याआधी आम्ही 6 फूट लांब आणि 3 फूट रुंद कुलूप बनवले होते, पण काही लोकांनी मोठे कुलूप बनवण्याचा सल्ला दिला, म्हणून आम्ही त्यावर काम सुरू केले. कुलूप आता अंतिम टप्प्यात आहे.
सत्यप्रकाश यांनी सांगितले की, हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांना सुमारे 2 लाख रुपये खर्च आला. त्याचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने पैसे साठवले आहेत. ते म्हणाले की, मी अनेक दशकांपासून कुलूप बनवण्याचा व्यवसाय करत असल्याने राममंदिरासाठी मोठे कुलूप तयार करण्याचा विचार केला. ते म्हणाले की, आमचे शहर कुलूपांसाठी ओळखले जाते. असे कुलूप यापूर्वी कोणीही केले नव्हते. दुसरीकडे, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी शुक्रवारी सांगितले की, मंदिर ट्रस्ट पुढील वर्षी 21, 22 आणि 23 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करेल, ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण पाठवले जाईल.