जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे (Indian Army) तीन जवान शहीद झाले. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यातील हलान वनक्षेत्रात शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन जवांनाना वीरमरण आलं आहे. जखमी झालेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर शोध मोहीम सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे. हलान वनक्षेत्रात शोध मोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी क्रॉस फायरिंग केले आणि या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. यावेळी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीनगर-स्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. “कुलगाममधील हलानच्या उंच शिखरांवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून 4 ऑगस्ट 2023 रोजी सुरक्षा दलांनी ऑपरेशन हलान सुरू केले होते. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि नंतर शहीद झाले,” अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली.

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना अटक

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इमरान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या पथकाने या तिघांना गुप्तचर माहितीच्या आधारे शहरातील हरनाबल नातीपोरा येथील चेक पोस्टवरून अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, 10 राउंड पिस्तूल, 25 राउंड एके-47 रायफल आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Related posts