…अन् PM मोदींचं ‘ते’ वाक्य ऐकून सरन्यायाधीशांनी जोडले हात; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Video CJI Chandrachud PM Modi Speech: देशभरामध्ये आज 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये देशातील 140 कोटी जनतेचा कुटुंबीय असा उल्लेख करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी आपल्या भाषणामध्ये अनेक विषयांना हात घातला. मोदींनी मागील 10 वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजेच सत्तेत आल्यापासून केलेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळेस मोदींनी स्थानिक भाषांचं महत्त्व किती आहे याबद्दलही भाष्य केलं.

मोदी नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी सुप्रीम कोर्टाचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी भाषणात असं काही म्हटलं की समोरच बसलेले देशाचे सरन्यायाधीश हसू लागले. त्यांनी हात जोडून मोदींनी केलेलं कौतुक स्वीकारलं. पंतप्रधान मोदींनी स्थानिक भाषांमध्ये कोर्टाचे निकाल उपलब्ध करुन देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा उल्लेख करत मातृभाषांचं महत्त्व वाढत आहे, असं म्हटलं. “मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानू इच्छितो. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्यणानुसार कोर्टाच्या निकालामधील ऑप्रेटीव्ह भाग (कारवाईसंदर्भातील निकाल) स्थानिक भाषेत असेल. यावरुनच स्थानिक भाषांचं महत्त्व वाढत असल्याचं लक्षात येतं,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

मोदींचं म्हणणं ऐकून सरन्यायाधीशांनी दिला प्रतिसाद

पंतप्रधान मोदींनी केलेलं हे विधान ऐकून स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमंत्रित केलेल्या मान्यवरांमध्ये बसेलेले सरन्यायाधीस डी. व्हाय. चंद्रचूड यांनी हसत हात जोडून मोदींनी केलेल्या विधानाला प्रतिसाद दिला. मोदींचं विधान ऐकून इतरांनी टाळ्या वाजवल्या.

यानंतरच्या एका भाषणामध्ये सरन्यायाधीशांनी मोदींनी सुप्रीम कोर्टाच्या प्रयत्नांची दखल आपल्या भाषणात केल्याचा संदर्भ देत आतापर्यंत कोर्टाने 9423 निकालांचं भाषांतर केल्याचं सांगितलं.

शिक्षणामध्येही मातृभाषेला स्थान दिलं

आज मातृभाषांचं महत्त्व वाढत आहे. पंतप्रधान मोदींनी मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचाही उल्लेख केला. मातृभाषांमध्ये शिक्षण देण्यावर आम्ही भर दिला आहे. पंतप्रधान मोदींनी लहान मुलांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न केले असून त्याचे परिणाम दिसत असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आम्ही स्थानिक भाषांमधून शिक्षण देण्यावर भर दिला, असंही मोदींनी सरकारच्या शैक्षणिक धोरणांबद्दल बोलताना सांगितलं.

कोर्टाने नेमका निकाल काय दिला?

काही काळापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. कोर्टाने दिलेला निकाल हा स्थानिक भाषांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला होता. सुप्रीम कोर्टातील निर्णयांचं इंग्रजीमधून हिंदीमध्ये भाषांतर केलं जातं. यानंतर त्याचं स्थानिक भाषांमध्ये भाषांतर केलं जातं. 500 पानांहून अधिक पानांच्या निकालाचं संक्षिप्त स्वरुपामध्ये अर्थ काढून केवळ 2 पानांमध्ये हा निकाल समजेल अशा स्थानिक भाषेत सादर केला जातो. सुप्रीम कोर्टाने भाषांतर करुन ज्या भाषांमध्ये निकाल अपलोड करण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये हिंदीबरोबरच तामीळ, गुजराती आणि उडिया भाषेचा समावेश आहे.

Related posts