( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandrayaan 3 Mission: इस्रोच्या चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिग केले आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा फडकवताच देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचबरोबर भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिगसाठी देशभरातील सर्व नागरिक उत्सुक होते. अनेक ठिकाणी होमहवनदेखील करण्यात आले होते. अखेर तो क्षण आलाच ज्यावेळी चंद्रावर भारताने तिरंगा फडकावला. ही संपूर्ण मोहिम लाइव्ह दाखवण्यात आली होती. युट्यूबवर लाखो लोक ही संपूर्ण मोहिम लाइव्ह पाहत होते.
5 वाजून 15 मिनिटांनी इस्रोचे लाइव्ह सुरू झाले होते. त्यावेळी दहा लाख लोक पाहत होते. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी ही संख्या 20 लाखापर्यंत पोहोचली. तर, दहा मिनिटांनी 30 लाख लोक ही मोहिम पाहत होते. 5 वाजून 41 मिनिटांनी इस्रोच्या युट्यूब चॅनलवर 41 लाख लोक लाइव्ह बघत होते. लहान मुलांसह जेष्ठ नागरिक व तरुण मुलंदेखील या मोहिमेचे साक्षीदार होण्यास उत्सुक होते.
6.04 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. त्याच्या 20 मिनिटे आधीपासून लँडिगची प्रक्रिया सुरु झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या मोहिमेकडे लक्ष ठेवून होते. विक्रम लँडिग लँड होण्याआधीची 15 मिनिटे ही अतिशय निर्णायक होती. याच काळात इस्रोची मोहिमेचे लाखो लोक साक्षीदार झाले आहे. लँड होण्यापूर्वी विक्रम लँडर 25 किमी X 134 किमीच्या कक्षेत फिरत होते. त्यामुळं लँड होण्यासाठी चांद्रयानाला 25 किमीच्या उंचीवरुन खाली जावे लागणार होते.
विक्रम लँडरने 25 किमीच्या उंचीवरुन चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केल्यानंतरचा हा क्षण संपूर्ण देश श्वास रोखून धरत पाहत होता. यावेळी इस्रोच्या युट्यूब चॅनेलवर रेकॉर्डब्रेक युजर्स होते. जेव्हा लाइव्ह सुरू झाले तेव्हा दहा लाख असणारी संख्या लँडिगच्यावेळी 80 लाखांपर्यंत पोहोचली होते. चॅनेलच्या सब्रस्क्राइबर्सपेक्षा अधिक जणांनी ही मोहिम लाइव्ह बघितली. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिगनंतर इस्रोने हादेखील एक इतिहास रचला आहे.
दरम्यान, विक्रम लँडर चंद्रावर पोहोचताच भारतीयांना पहिला मेसेज पाठवला होता. भारतीयांनो मी चंद्रावर पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा असा मेसेज चांद्रयान-३ने पाठवला होता. तर, एकीकडे चांद्रयान 3 ची लँडिग होताच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला होता.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होतात. हे क्षण फार अविस्मरणीय, अभुतपूर्व विकसित भारताच्या शंखनादाचे आहेत. अडचणींचा महासागर आपण पार केले आहेत. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा, 140 कोटींच्या ह्रदयाच्या सामर्थ्याचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.