SC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, शवविच्छेदनान उलगडलं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी रेणु सिन्हा यांच्या पतीला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर पती घराच्या स्टोअर रुममध्ये लपून बसला होता. पोलिसांनी हत्येच्या 24 तासानंतर त्याला ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान, त्यानेच हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर काही धक्कादायक खुलासे झाले आहे. 

शवविच्छेदनातून समोर आलं आहे की, रेणु सिन्हा यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. दरम्यान, गळा दाबण्याआधी त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर इजा झाली होती हेदेखील उलगडलं आहे. 

रेणू सिन्हा यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा असल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं आहे. रेणु सिन्हा 10 सप्टेंबर रोजी सकाळी चहा पित असताना त्यांची पतीसह वाद झाला. रेणु सिन्हा यांचा 62 वर्षीय पती नितीन सिन्हा माजी भारतीय महसूल सेवा अधिकारी आहे. 

वादानंतर रेणु सिन्हा खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यानंतर त्यांचा गळा दाबला असता गुदमरुन मृत्यू झाला असं शवविच्छेदनात समोर आलं आहे. पोलीस सध्या फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. 

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं असता नितीन सिन्हा जोपर्यंत अटक झाला नाही, तोपर्यंत घराबाहेर पडलाच नव्हता. हत्या केल्यानंतर घरातच तो लपून होता. घराच्या स्टोअर रुममध्ये 24 तास तो लपून बसला होता. दरम्यान, पोलीस नितीन सिन्हाच्या कॉल रेकॉर्डिंगही तपासणार आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

नोएडा येथे सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 61 वर्षीय रेणु सिन्हा यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील बाथरुममध्ये आढला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. रविवारी नोएडा सेक्टर 30 मधील D-40 कोठीत हा सगळा प्रकार घडाल होता. यानंतर नातेवाईकांनी रेणु सिन्हा यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. रेणु सिन्हा यांच्या पतीनेच हत्या केल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला होता. पण तो मात्र फरार असल्याने पोलिसांनी शोध सुरु केला होता. 

रेणु सिन्हा यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. पोलीस रेणु सिन्हा यांच्या पतीचा शोध घेत असतानाच कोठीमधील स्टोअर रुममध्ये तो लपून बसल्याचं समोर आलं. पोलिसांना अखेर त्याला शोधण्यात यश आलं आहे. हत्येनंतर मागील 24 तासांपासून पती स्टोअर रुममध्येच होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

4 कोटींच्या डीलवरुन वाद

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पती-पत्नीत कोठीवरुन वाद सुरु होता. या कोठीचा 4 कोटींमध्ये व्यवहार झाला होता. ज्यामुळेच पतीने ही हत्या केली आहे. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. 

रेणु सिन्हा यांच्या भावाने पोलिसांकडे धाव घेत बहिण फोन उचलत नसल्याने शंका उपस्थित केली होती. दरम्यान पोलीस दरवाजा तोडून घरात घुसले होते. यावेळी शोध घेतला असता बाथरुममध्ये रेणु सिन्हा यांचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी संशय असल्याने रेणु सिन्हा यांच्या पतीला फोन केला असता, तो बंद होता. यानंतर हा संशय बळावला होता. 

Related posts