अझीम प्रेमजींच्या ‘विप्रो’ने CFO पदाची जबाबदारी सोपवलेल्या अपर्णा अय्यर आहेत तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Who Is Aparna Iyer: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतामधील आघाडीची कंपनी असलेल्या अझीम प्रेमजी यांच्या ‘विप्रो’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच चीफ फायनॅनशिएल ऑफिसर (सीएफओ) पदावर ‘विप्रो’ने एका महिलेला नियुक्त केलं आहे. ‘विप्रो’सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जबाबदारीचं हस्तांकरण होतं तेव्हा त्याबद्दल आधी कॉर्परेट क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चा असते. मात्र या महिलेची नियुक्ती ही अगदीच अचानक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कॉर्परेट क्षेत्रात ‘विप्रो’च्या या निर्णयाची चर्चा आहे. ‘विप्रो’ने ज्या महिलेच्या खांद्यावर ही मोठी जाबबदारी सोपवली आहे त्या महिलेचं नाव आहे अपर्णा अय्यर!

‘विप्रो’चे विद्यमान सीएफओ जतीन दलाल यांनी 21 वर्षांच्या सेवेनंतर 21 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अपर्णा यांना नियुक्त करण्यात आलं आहे. अपर्णा नेमक्या कोण आहेत? त्यांची कारकीर्द कशी आहे यावर नजर टाकूयात…

1) ‘विप्रो’च्या नव्या सीएफओ अपर्णा अय्यर या चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. अपर्णा या 2002 च्या CA बॅचच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत.

2) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (ICAI) माध्यमातून एसीकडे वळण्यापूर्वी, अपर्णा अय्यर यांनी 2001 मध्ये मुंबईतील नरसी मोंजी येथून वाणिज्य शाखेत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

3) अपर्णा अय्यर 2003 मध्ये वरिष्ठ अंतर्गत लेखा परीक्षक (Senior Internal Auditor) म्हणून ‘विप्रो’मध्ये रुजू झाल्या.

4) आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मजल दरमजल करत ‘विप्रो’मधील प्रमुख पदांची जबाबदारी पार पाडत आज अपर्णा अय्यर चीफ फायनॅनशिएल ऑफिसर (सीएफओ) पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

5) ‘विप्रो’मध्ये काम करताना अपर्णा अय्यर यांनी इंटरनल ऑडिट, बिझनेस फायनान्स, फायनान्स प्लॅनिंग आणि अॅनालिसिस, कॉर्पोरेट ट्रेझरी आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स यासह अनेक वित्तविषयक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

6) ‘विप्रो’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा अय्यर यांच्याकडे आर्थिक जोखीम व्यवस्थापन (financial risk management), भांडवल वाटप (capital allocation), कंपनीसाठी निधी उभारणे, व्यवसायासंदर्भाती रणनीती आखणे आणि व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सखोल ज्ञान आणि कौशल्य आहे.

7) अपर्णा अय्यर यांच्यावर नुकतीच पडलेली नवीन जबाबदारी येण्याआधी त्या ‘विप्रो’च्या ‘फुलस्ट्राइड क्लाउड ग्लोबल बिझनेस लाइन’मध्ये वरिष्ठ उपाध्यक्षा तसेच सीएफओ म्हणून काम करत होत्या.

8) नव्या भूमिकेमध्ये काम करताना अपर्णा अय्यर यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ थियरी डेलापोर्ट यांना रिपोर्ट करावं लागणार आहे.

9) डेलापोर्ट हे अपर्णा अय्यर यांचे थेट बॉस असतील. त्याचप्रमाणे अपर्णा अय्यर ‘विप्रो’च्या कार्यकारी मंडळात सहभागी होणार आहेत.

10) अपर्णा अय्यर यांनी आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2023 पासून ‘विप्रो’च्या चीफ फायनॅनशिएल ऑफिसर (सीएफओ) पदा पदभार स्वीकारला आहे.

Related posts