…अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com)

EMU train climbs on platform: उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे जंक्शनवर मंगळवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत सांगायचं झाल्यास लोकल ट्रेन मथुरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चढल्याने एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. या ईएमयू ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधीच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना मोठ्या दुर्घटनेची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढल्याने कोणीही जखमी झालं नाही. 

नक्की घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही ट्रेन मथुरा स्थानकामध्ये पोहचली. यामधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर रात्री 10 वाजून 55 मिनीटांनी लोको पायलेट इंजिन बंद करुन ट्रेन साईडिंगला लावण्याच्या तयारी होता. त्याचवेळी अचानक इंजिनने वेग पकडला. इंजिन अचानक सुरु झाल्याने लोको पायलेट गोंधळून गेला. मात्र त्याला काही कळण्याच्या आधीच इंजिन ट्रेन स्टॉपर तोडून प्लॅटफॉर्मवर चढलं होतं. प्लॅटफॉर्म संपतो त्या ठिकाणी जो उतार असतो त्याच्या बाजूच्या पटरीवरच हा सारा प्रकार घडल्याने इंजिन थेट प्लॅटफॉर्मवर चढलं. प्लॅटफॉर्मच्या दिशेने अचानक अत्यंत वेगाने इंजिन येत असल्याचं पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवासी पळू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी सामान सोडून पळलालेल्या या प्रवाशांकडील सामान मात्र या दुर्घटनेमध्ये इंजिनच्या खाली सापडलं. 

…तर अपघाताचे परिणाम अधिक भीषण असते

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिन प्लॅटफॉर्मवर चढल्यानंतर काही अंतरावर ओएचई लाइनचा वीजेचा खांब होता. या खांबाला धडकून इंजिन थांबलं. वीज प्रवाह सुरळीत राहण्यासाठी उभारण्यात आलेला हा खांब या ठिकाणी नसता अपघाताची दाहकता अधिक असतील. खांब नसता तर इंजिन थेट प्रवाशांपर्यंत पोहोचलं असतं आणि अनेक प्रवासी कदाचित या खाली दाबले गेले असते. मात्र सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणीही जखमी अथवा मृत्यूमुखी न पडल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु करण्यात आला आहे. 

कारवाई करणार

मथुरा रेल्वे जंक्शनचे निर्देशक एस. के. श्रीवास्तव यांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. या अपघातामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील वीज पुरवठा करणारी ओएचई लाइन विस्कळीत झाल्याने या स्थानकातून होणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

वाहतूक वळवण्यात आली

जोपर्यंत या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील वाहतूक इतर प्लॅटफॉर्मवरुन वळण्यात आल्याची माहिती स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related posts