चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maldives New Pro China President: मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी आपल्या विजयानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या छोट्या आकाराच्या देशाला अधिक सशक्त करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या नावाखाली या चीन समर्थक नेत्याने पदावर विराजमान होताच परदेशी सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील परदेशी सैनिकांची संख्या कमी करण्याचा संकल्प मुइज्जू यांनी बोलून दाखवला आहे. 

पहिल्याच भाषणात केलं ते विधान

शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करताना मुइज्जूर यांनी थेट भारताचा उल्लेख टाळला. मात्र या द्वीपसमुहामध्ये सैन्य तैनात करणारा भारत हा एकमेव देश आहे. मुइज्जूर यांनी सोमवारी रात्री राजधानी माले येथे एका सभेमध्ये भाषण देताना, “आम्ही मालदीवच्या लष्करी कायद्यांमध्ये बदल करणार आहोत. परदेशी सैन्य आम्ही परत पाठवणार आहोत. नक्कीच आम्ही हे करण्यात यशस्वी ठरु,” असं म्हटलं आहे.

भारताचा उल्लेख न करता इशारा

“ज्यांनी या लोकांना आणलं आहे त्यांना ते सैनिक परत पाठवायचे नाहीत. मात्र मालदीवच्या लोकांनी आता निश्चय केला आहे त्यांना परत पाठवण्याचा,” असं मालदीवचे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारलेल्या मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं आहे. मुइज्जू यांच्या या विधानाचा इशारा भारतीय लष्कराला या देशातून बाहेर काढण्याकडे होता असं सांगितलं जात आहे.

यामीन यांचे वारस

पायउतार झालेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोहिल यांनी पारंपारिक सहकारी असलेल्या भारताबरोबरचे लष्करी संबंध कायम ठेवले. भारताबरोबरचे संबंध अधिक सुदृढ होतील असा प्रयत्न सोहिल यांनी केला. त्यापूर्वीचे मालदीवचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल्ला यामीन यांनी मूलभूत सुविधांच्या उभारणीच्या नावाखाली चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि बीजिंगबरोबरचे संबंध अधिक सुदृढ करण्यावर भर दिला. मुइज्जू यांना यामीन यांच्या विचारांचे वारस मानलं जातं. यामीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना राष्ट्रपती निवडणूक लढण्यापासून रोखण्यात आल्यानंतर मुइज्जू यांनी निवडणूक लढवली.

11 वर्षांची शिक्षा भोगणाऱ्याला केलं मुक्त

आपल्या विजयानंतर काही तासांमध्येच मुइज्जू यांनी यामीन यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. यामीन मोठी सुरक्षा व्यवस्था असलेल्या माफुशी तुरुंगामध्ये 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. यामीन यांना मालेमध्ये नजरकैद करण्यात आलं होतं. मुइज्जू हे भ्रष्टाचार घडला त्यावेळेस महापौर होते.

मी चीन समर्थक नाही तर…

आपण चीन समर्थक नेते आहोत या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनाला मुइज्जू यांनी फेटाळलं आहे. मी मालदीव समर्थक आहे, असं मुइज्जू म्हणाले आहेत. “माझं सर्वात पहिलं प्राधान्य मालदीव आणि देशातील परिस्थिती कशी आहे याला असेल. मी मालदीव समर्थक म्हणून स्वत:ला ओखळू इच्छितो. जो कोणता देश आमच्या मालदीव समर्थक धोरणाला पाठिंबा देईल, त्याचं पालन करेल तो आमचा जवळचा मित्र असेल,” असं मुइज्जू म्हणाले. 

मोदींनी केलं अभिनंदन तर चीन म्हणालं…

मुइज्जू निवडणूक जिंकल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमध्ये, “मागील बऱ्याच काळापासून असलेल्या भारत मालदीव संबंध सुदृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असं म्हटलं होतं. दुसरीकडे चीनने मुइज्जू यांचं अभिनंदन करताना चीन मालदीवच्या लोकांनी केलेल्या निवडीचं स्वागत करत आहे, असं म्हटलं. बीजिंगमधील परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये चीनबरोबरीची पारंपारिक मैत्री अधिक सक्षम करण्यासाठी आणि दोन्ही देशांना फायदा होईल असं सहकार्य करण्यासाठी निरंतर प्रगतीपथावर दोन्ही देश वाटचाल करतील आणि यासाठी चीन मालदीवला सहकार्य करण्यास इच्छूक आहे असं म्हटलं आहे.

Related posts