कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशातील एका ज्योतिषाच्या घरात चोरी झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असता, त्यांच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीने प्रकरणाला मोठा ट्विस्ट दिला आहे. चोरी केलेल्या दोन्ही तरुणांनी इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, मुलांनी चौकशीत केलेल्या खुलाशानंतर ज्योतिषालाही अटक करण्यात आली आहे. 

कानपूरमधील गोविंद नगर परिसरात एक चोरी झाली होती. घरमालक आणि ज्योतिषी असणाऱ्या तरुण शर्माने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. दोन तरुण आपल्या प्रेयसीची समजूत कशी काढायची? असं विचारण्यास आले आणि कोल्ड्रिंक पाजून बेशुद्ध करत चोरी करुन फरार झाले असं त्याने सांगितलं होतं. 

यानंतर पोलिसांना इंस्टाग्रामला एक रील दिसली. यामध्ये दोन तरुण हॉटेलमध्ये नोटांचा बेड बनवून त्यावर झोपले होते. या रीलच्या आधारे कानपूर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी केलेला खुलासा ऐकून चक्रावले. 
ज्योतिषाकडून मुलांचं लैंगिक शोषण

तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं की, चोरी झाली आहे पण त्याबद्दल देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांनी पोलिसांना सांगितलं की, आपल्या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी ते तरुण शर्माकडे गेले होते. पण ज्योतिषाने एकाच रात्री दोन्ही मुलांसह जबरदस्तीने समलैंगिक संबंध ठेवले. 

दोन्ही मुलांनी विरोध केला असता त्याने भस्म करण्याची धमकी दिली. तसंच त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. दोन्ही मुलं घाबरली असल्याने त्यांनी जास्त विरोध केला नाही. 

बदला घेण्यासाठी मुलांनी केली चोरी

लैंगिक शोषण केल्यानंतर तरुण शर्मा झोपला असता दोन्ही मुलांनी त्याच्या घऱातील तिजोरी फोडली आणि चोरी करुन फरार झाले. तरुण शर्माला सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी त्याने पोलिसांना चोरी वगळता बाकीची खोटी माहिती दिली. 

गुरुवारी जेव्हा कानपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांची चौकशी केली, तेव्हा सगळं प्रकरण उघडकीस आलं. यानंतर कानपूर पोलिसांनी आरोपी तरुण शर्माला अटक केली आहे. 

Related posts