लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajasthan Assembly Election 2023 : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र आता राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता या निवडणुका 25 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. मात्र, एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.

23 नोव्हेंबर या दिवशी देव उथनी एकादशी आहे. राजस्थानात देव उथनी एकादशी ही लग्नासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानली जाते. त्यामुळे राजस्थानमध्ये 50,000 हून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे. हे कारण लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आता मतदानाची तारीख दोन दिवसांनी वाढवून 25 नोव्हेंबर केली आहे. राज्यातील मतदान दिवसाची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी लोक सातत्याने निवडणूक आयोगाकडे करत होते. जर 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक घेतली तर राज्यातील मतदानावर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

बुधवारी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत मतदानाची तारीख बदलून 23 नोव्हेंबर 25 नोव्हेंबर केली आहे. मतदानाच्या तारखेची  घोषणा झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि विविध माध्यमांनी निवडणुकीच्या तारखेबाबत भारत निवडणूक आयोगाकडे आपली मते मांडली होती. आयोगाने याचा विचार करून मतदानाची तारीख 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर (शनिवार) केली.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांसाठी मतदान 

पाच राज्यांतील 679 विधानसभा जागांसाठी 9 ऑक्टोबर रोजी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम इथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.  मध्य प्रदेशातील 230, राजस्थानमधील 200, तेलंगणातील 119, छत्तीसगडमधील 90 आणि मिझोराममधील 40 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील सर्व 51,753 मतदान केंद्रांवर 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. राजस्थानमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 74.71 टक्के होती. आता राजस्थानमधील सर्व 200 विधानसभा जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

Related posts