मजुराच्या खात्यात अचानक जमा झाले 2 अब्ज 21 कोटी रुपये, कुटुंबीयांची झोपच उडाली; पण पुढे जे झालं…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशात एक मजूर रातोरात करोडपती नव्हे तर अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात तब्बल 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. बँक खात्यात जमा झालेला रकमेचा आकडा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण आता अब्जाधीश होणं त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मजुराला थेट प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे. 

लालगंज ठाणे क्षेत्राच्या बरतनिया गावातील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या शिवप्रसाद निषाद यांच्या घऱी प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिवप्रसाद मजूर असून दिल्लीत दगडं घासण्याचं काम करतात. प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. याचं कारण नोटीशीत शिवप्रसाद यांच्या बँक खात्यात 221 कोटींचा व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. यासह त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रं घेऊन हजर राहण्यास सांगण्यात आलं. 

2019 मध्ये हरवलं होतं पॅन कार्ड

आपल्या खात्यात इतके पैसे कुठून आले हे शिवप्रसाद यांना समजत नाही आहे. ते काम सोडून दिल्लीवरुन उत्तर प्रदेशात परतले आहेत. शिवप्रसाद यांनी शंका व्यक्त केली आहे की, 2019 मध्ये आपलं पॅनकार्ड हरवलं होतं. त्याच्याच मदतीने कोणीतरी आपल्या नावे बँक खातं उघडून हा व्यवहार केला आहे. 

शिवप्रसाद यांनी लालगंज पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेत याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. शिवप्रसाद प्राप्तिकर विभागात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेण्याचाही प्रयत्न करत आहेत. 

शिवप्रसाद यांनी सांगितलं आहे की, मी मजूर असून दगडं घासण्याचं काम करत पैसा कमावतो. इतक्या पैशांचा व्यवहार कोणी केला याची मला काहीच माहिती नाही. कदाचित कोणीतरी माझ्या पॅनकार्डचा गैरवापर केला आहे. ज्या खात्यावर 2 अब्ज 21 कोटी 30 लाख रुपये जमा झाले आहेत ते माझंच आहे. पण हा व्यवहार कधी झाला याची मला काहीच माहिती नाही. इतर खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. 

घऱी आलेल्या नोटीसमध्ये बँक खात्यात 2 अब्ज 21 कोटी 30 लाखांची रक्कम जमा झाल्याचा उल्लेख आहे. 4 लाख 58 हजार 715 रुपयांचा टीडीएस कापण्याचाही उल्लेख आहे. 

अब्जो रुपयांच्या या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभाग आणि पोलीस सक्रीय झाले आहेत. दोन्ही विभागांनी आपापल्या परीने तपास सुरु केला आहे. खात्यातील व्यवहाराची चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान प्राप्तिकर विभाग सध्या बँकेच्या संपर्कात आहे. 

Related posts