( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : रामनगरी असलेल्या अयोध्येतून (Ayodhya) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील साधूची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सकाळी या घटनेचा उलघडा झाला आहे. हनुमानगढी मंदिरातील साधू राम सहारे दास (Sadhu Ram Sahare Das) यांच्या हत्येनं अयोध्येत खळबळ उडाली आहे. साधू राम सहारे दास हे हनुमानगढीच्या बसंतीया पट्टीचे संत दुर्बल दास यांचे शिष्य होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस (UP Police) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे.
अयोध्या जिल्ह्यातील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यांतर्गत सिद्ध पीठ हनुमानगढी मंदिर परिसरात असलेल्या आश्रमात साधू राम सहारे दास यांची भोसकून हत्या करण्यात आली. त्यांच्या मानेवर, छातीवर आणि पाठीवर धारदार शस्त्राच्या खोल खुणा आहेत. आधी त्यांचा पातळ वायरने गळा आवळून नंतर चाकूने वार करण्यात आल्याचा संशय आहे. मंदिराच्या आतमध्येच साधू राम सहारे दास यांचा मृतदेह सापडला आहे.
गुरुवारी सकाळी ही माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राजकरण नायर, एसपी सिटी मधुबन सिंग, सीओ बिकापूर डॉ. राजेश तिवारी यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळाची चौकशी केली. हनुमानगढीच्या पायऱ्यांलगतच्या खोलीत साधूचा मृतदेह आढळून आला. त्यांचा गळा चिरला होता. त्याच्यासोबत खोलीत आणखी तीन साधू राहत होते. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत साधू राम सहारे दास आश्रमाच्या सर्वात आतल्या तिसर्या खोलीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यासोबत दोन शिष्यही राहत होते. या घटनेनंतर ऋषभ शुक्ला नावाचा शिष्य घटनास्थळावरून फरार झाल्याचे आढळून आले तर दुसरा शिष्य गोविंद दास याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरार ऋषभ शुक्ला याला मयत साधूने 15 दिवसांपूर्वी आपल्याजवळ ठेवले होते, तो जेवण बनवत असे.
दरम्यान, या घटनेमागे दरोड्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंदिरात आणि आजूबाजूला राहणारे नागा साधू सांगतात की मृत राम सहारे दास हे हनुमानजींचा श्रृगांर करायचे. या आश्रमातील सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले होते, पण कोणीतरी ते बंद केले होते. पोलिसांना काही फुटेज मिळाले असून त्यात सीसीटीव्ही बंद करणारा व्यक्ती कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज आणि हार्डडिस्क ताब्यात घेतली आहे.