( प्रगत भारत । pragatbharat.com)
RD Interest Rates: आर्थिक नियोजनाची सवय भारतामध्ये फारच कमी वयापासून लागते. सर्वसामान्य सरासरी वार्षिक उत्पन्न पाहता देशात लहानमोठ्या गुंतवणुकी करत त्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीनं एखादी मोठी रक्कम सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा मोठा आणि मुख्य हेतू असतो. सर्वसामान्यांच्या याच लहान स्वरुपातील ठेवींना हातभार लावला जातो तो बँकांच्या आणि पोस्ट खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून.
बँक आणि पोस्ट विभागाकडून (Bank and Post Office) सादर केल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि मोठी गुंतवणूक असणारी योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अर्थात, आरडी. सध्याच्या घडीला पोस्ट विभागाकडून आरडी खात्यांवरील व्याजदर 6.7 टक्के करण्यात आला आहे. तर, बँकांकडून या खात्यांवर तुलनेनं कमी व्याज दिलं जात आहे.
बँक आणि पोस्टाच्या आरडीमध्ये फरक
बँक आणि पोस्टाकडून सादर केल्या जाणाऱ्या आरडीमध्ये सर्वाधिक फरक असतो तो म्हणजे कालावधीचा. जिथं बँक तुम्हाला 6 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंतचा कालावधी निवडण्याचं स्वातंत्र्य देते तिथंच पोस्ट विभागामध्ये मात्र तुम्ही फक्त 5 वर्षांसाठीच पैसे गुंतवू शकता.
आरडी ही एक प्रकारची नियोजित ठेव योजना अर्थात एक सिस्टमेटिक सेविंग असते. इथं तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता आणि निर्धारित काळानंतर तुम्हाला परताव्याच्या स्वरुपात व्याजासहीत ठराविक रक्कम परत मिळते. शिवाय काही वाढीव सवलतीही तुम्हाला दिल्या जातात.
आरडी खात्यासाठीची पात्रता आणि व्याजदरातील फरक
कोणीही भारतीय नागरीक आरडी खातं सुरु करु शकतं. 10 वर्षांवरील बालकांनाही काही अटींच्या पूर्ततेसह हे खासं सुरु करता येतं. RD अकाऊंट Joint Account स्वरुपातही सुरु करता येतं.
व्याजदराविषयी सांगावं तर, पोस्टाकडून दिली जाणारी व्याजाची रक्कम बँकेच्या तुलनेत जास्त असते. सध्याच्या घडीला HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, Canara Bank, Bank Of Baroda या बँकांकडून आरडी खात्यांवर चांगलं व्याज दिलं जातं. हे व्याजदर 6.75 ते 7 टक्क्यांच्या घरात आहेत.
बँक किंवा पोस्ट विभाग, कुठंही आरडी खातं सुरु करणं सुरक्षित पर्याय आहे. त्यातही बँकांच्या तुलनेत पोस्टाकडून तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. पण, खातं बंद करण्यच्या नियमांच्या बाबतीत बँक तुम्हाला मोठी मदत करते. तेव्हा तुम्हाला नेमकं कुठं आरडी अकाऊंट सुरु करायचंय याचा निर्णय सारासार विचार करूनच घ्या.