‘त्या आम्हाला नाही, तर….’, शहीद कॅप्टनच्या रडणाऱ्या आईसह फोटो काढल्यानंतर मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबाला चेक सोपवण्यासाठी पोहोचलेले उत्तर प्रदेश सरकारमधील उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय वादात अडकले आहेत. यानंतर त्यांनी आता व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. योगेंद्र उपाध्याय यांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला असून, विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. मंत्री उपाध्याय यांनी सांगितलं की, “शहीद कॅप्टनच्या कुटुंबाशी माझे जुने संबंध आहेत. पण एका काँग्रेस नेत्याने हे चुकीच्या पद्धतीने सादर केलं. मीडियानेही दुसरी बाजू जाणून न घेता व्हिडीओ व्हायरल केला. ही थोडी खंताची बाब आहे”. 

जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे शहीद झालेले कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबाला सरकारच्या वतीने 50 लाखांचा चेक देण्यात आला. कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय त्यांच्या घरी 25-25 लाखांचे दोन चेक घेऊन पोहोचले होते. यादरम्यान मुलाच्या निधनाने व्यथित झालेल्या आईचा आक्रोश सुरु होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली.

योगेंद्र उपाध्याय यांनी शहीद शुभम गुप्ता यांच्या घरी चेक घेऊन जाण्यावर आणि त्यावरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “मी शुभम गुप्ता यांच्या आईला भेटण्यासाठी गेलो नव्हतो. हे कुटुंब मला फार जवळचं आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखत होतो. मी त्याला माझ्या हाताने जेवण भरवलं आहे. रात्री 10 वाजता मला शहीद झाल्याची बातमी समजली तेव्ह मी दुसऱ्या गावात होतो. तेथून मी तात्काळ निघालो आणि 2 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. इतके माझे त्यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत”.

मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली म्हणून 25-25 लाखाचे दोन चेक पाठवले होते. एक शहीदाचे वडील आणि दुसरा आईच्या नावे होता. याशिवाय सरकारी नोकरी दिली जाईल आणि रस्त्याचं नामकरण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं.

मंत्र्यांनी सांगितलं आहे त्यानुसार, “मला सकाळी एसडीएम यांनी हे दोन्ही चेक पोहोचवायचे आहेत असं सांगितलं. तसंच नोकरी आणि रस्त्याच्या नामकरणाबद्दलही विचारलं. मी शहीद कॅप्टनच्या वडिलांना एकांतात भेटून दोन चेक आले आल्याचं सांगितलं. तसंच कोणत्या रस्त्याला तुमच्या मुलाचं नाव दिलं जावं आणि सरकारी नोकरीसाठी कोणाला प्राधान्य द्यायचं याचीही विचारणा केली. वडिलांनी मी त्याच्या आईला बोलावतो असं सांगितलं. मी त्यांनी मानसिक स्थिती योग्य नसावी  असं बोललो होतो. त्यावर नातेवाईक म्हणाले की, ती तीन दिवसांपासून खोलीत बंद आहे. आपल्या मुलाने किती मोठं काम केलं आहे याचा तिला अंदाज नाही. सर्व शहर येथे श्रद्धांजली देण्यासाठी आलं आहे. तिला हे पाहिल्यावर अभिमान वाटेल”.

पुढे त्यांनी सांगितलं की, “नातेवाईक शहीद कॅप्टनच्या आईला घेऊन बाहेर आले होते. तिथे त्या लोकांना भेटल्या. चेक दिला जात असताना मीडियाने फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावर त्या मीडियाला येथे प्रदर्शन भरवू नका असं सांगत होत्या. पण काँग्रेस नेत्याने हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने दाखवला आणि मीडियानेही तसाच व्हायरल केला ही खंत आहे”.

राजौरीत 2 अधिकारी आणि 2 जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये बुधवारी दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले होते. शहिदांमध्ये कॅप्टन शुभम गुप्ताही आहे. राजौरीत दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशन करण्यात आलं. सर्च ऑपरेशन सुरु असतानाच चकमक झाली आणि चौघे शहीद झाले.  

Related posts