योगी आदित्यनाथांनंतर योगी बालकनाथ.. राजस्थानचे संभाव्य ‘भावी CM’; 6 व्या वर्षी घर सोडलं अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajasthan Assembly Elections 2023 Who is Mahant Balaknath Yogi : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. पहिल्या 3 तासांच्या मतमोजणीनंतर राजस्थानमधील 199 जागांपैकी 113 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर 70 जागांवर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार 16 जागांवर आघाडीवर आहे. असं असतानाच आता राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असतानाच वसुंधरा राजेंबरोबरच आणखीन एक नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. हे नाव म्हणजे खासदार महंत बाबा बालकनाथ योगी. भारतीय जनता पार्टीने आपल्या 7 खासदारांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. यामध्येच बाबा बालकनाथ योगी यांचा समावेश होता. 

युपीचा प्रयोग राजस्थानमध्ये?

बाबा बालकनाथ यांच्याविरोधात बहुजन समाजवादी पार्टीचे माजी नेते इमरान खान यांचं आव्हान आहे. पहिल्या 3 तासांच्या मदतमोजणीनंतर बाबा बालकनाथ 16 हजार 200 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे बाबा बालकनाथ यांचा विजय निश्चित मानला जात असून ते मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळेच ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचा चेहरा भाजपासाठी फायद्याचा ठरत आहे तसाचे प्रयोग राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ योगी यांच्या माध्यमातून केला जाईल अशी दाट शक्यता आहे. 

‘भविष्यातील मुख्यमंत्री’

बाबा बालकनाथ यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार भंवर जितेंद्र सिंह यांना 3 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं होतं. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच बाबा बालकनाथ योगी हे भाजपाचे राजस्थानमधील फायब्रॅण्ड नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध अशलेल्या बालकनाथ यांच्या प्रचारासाठी खुद्द योगी आदित्यनाथ यांनी यंदा प्रचारसभा घेतल्या होत्या. योगी आदित्यनाथ यांनीच बाबा बालकनाथ योगींचा उल्लेख ‘भविष्यातील मुख्यमंत्री’ असा केला होता. राजस्थानमधील लोक बाबा बालकनाथ योगी यांना ‘राजस्थानचे योगी’ नावानेही ओळखतात.

एक्झिट पोलमधील दुसरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री

‘आजतक आणि अॅक्सेस माय इंडिया’च्या एक्झिट पोलमध्येही बाबा बालकनाथ योगी यांचा उल्लेख दिसून आला होता. मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती म्हणून मतदारांनी अशोक गहलोत यांच्या पारड्यात मतं टाकली होती. 32 टक्के लोकांनी अशोक गहलोत मुख्यमंत्री व्हावेत असं म्हटलेलं. मात्र त्यानंतर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर वसुंधरा राजे किंवा चर्चेतील चेहरा असलेले सचिन पायलट नव्हते तर बाबा बालकनाथ योगी होते. 10 टक्के लोकांनी बाबा बालकनाथ योगी यांना मुख्यमंत्री करावं असं म्हटलेलं.

शेतकरी कुटुंबात जन्म

बाबा बालकनाथ योगी यांचा अल्वर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसारामध्ये चांगला प्रभाव आहे. भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकारणासाठी बाबा बालकनाथ योगी यांची चेहरा अगदी उत्तम आहे. बाबा बालकनाथ योगी यांचा जन्म 16 एप्रिल 1984 साली अल्वर जिल्ह्यातील कोहराना गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सुभाष यादव आणि आईचं नाव उर्मिला देवी आहे. यादव कुटुंब हे पहिल्यापासूनच साधू संतांची सेवा करण्यासाठी ओळखलं जातं.

असं पडलं नाव…

आपल्या एकुलत्या एका मुलाला सुभाष यादव आणि उर्मिला देवी यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच अध्यात्मिक अध्ययनासाठी महंत खेतानाथ यांच्याकडे पाठवलं. महंत खेतानाथ यांच्यानंतर ते महंत चांदनाथ यांच्याकडे गेले. लहान मुलांप्रमाणे वागणाऱ्या यादव कुटुंबातील या मुलाला महंत चांदनाथ यांनी या मुलाला बालकनाथ नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. महंत चांदनाथ यांनी 29 जुलै 2016 रोजी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. महंत बाबा बालकनाथ हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायामधील आठवे संत आहेत. ते बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे चान्सलरही आहेत.

दोघे एकाच पंथामधील

योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे दिसणारे बाबा बालकनाथ योगी हे सुद्धा आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. योगी आदित्यनाथ आणि आणि बाबा बालकनाथ योगी हे दोघेही एकाच पंथांतून म्हणजे नाथ संप्रदायामधील महतं आहेत. बालकनाथ रोहतकमधील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार, योगी आदित्यनाथ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना रोहतकच्या गादीवरील उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. बाबा बालकनाथ योगी हे योगी आदित्यनाथांचे निकटवर्तीय मानले जातात.

12 वी पर्यंत शिक्षण आणि एकूण संपत्ती…

बाबा बालकनाथ योगी यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आपण ओबीसी असल्याचं म्हटलं आहे. बाबा बालकनाथ योगी हे 39 वर्षाचे आहेत. त्यांच्याकडे एकूण 45 हजारांची कॅश असून नवी दिल्लीतील स्टेट बँकेच्या पार्लामेंट हाऊस संसद भवन शाखेमध्ये 13 लाख 29 हजार 558 रुपये आहेत. याशिवाय एसबीआयच्या तिजारा शाखेमध्ये आणि अन्य एका बँकेत 5 हजार रुपये आहेत. त्यांच्याकडे एकूण 13 लाख 79 हजार 558 रुपयांची संपत्ती असून त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.

Related posts