( प्रगत भारत । pragatbharat.com)
Cyber Crime Part Time Job Offer: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना या आधुनिक गुन्हेगारीबद्दल, आपण फसवले जातोय याबद्दल अनेकांना पुसटशीही कल्पना नसते. अनेकदा हे ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेमध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीला तब्बल 61 लाख 58 हजारांना गंडा घालण्यात आला आहे.
पार्ट टाइम जॉबचा मेसेज
बेंगळुरुमध्ये राहणारे उदय उल्लास नावाची ही व्यक्ती सोशल मीडियावरुन काही अॅप्सच्या माध्यमातून शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेडिंगवर नजर ठेऊन असतात. मात्र याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकदिवस त्यांना पार्ट टाइम जॉबची संधी अशी ऑफर देणारा एक मेसेज आला आणि पुढे जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं. उदय यांना त्यांच्या टेलिग्राम अकाऊंटवर पार्ट टाइम जॉब ऑफरचा मेसेज आला. ऑफर देणारी व्यक्ती एका महिला होती. आपलं नाव सुहासिनी असल्याचं तिने सांगितलं. पार्ट टाइम जॉब मिळवण्याची इच्छा व्यक्त केलेल्या उदयला एका वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रासारमाध्यमांनी दिली आहे.
विश्वास संपादित केला
या वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांनी उदय यांचा विश्वास संपादन केला. उत्तम मोबदला देतो असं सांगून उदय यांना आधी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. सुरुवातीला उदय यांना 10 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं. या गुंतवणुकीमधून तुम्ही 20 लाखांपर्यंतची कमाई करु शकता असं सांगण्यात आलं.
10 हजार गुंतवून 20 लाख कमवले असं सांगितलं पण…
10 हजार गुंतवून तुम्ही 20 लाख कमावले आहेत असं सांगण्यात आलं. त्यानंतर उदय यांनी हे 20 लाख रुपये काढून घेण्यासंदर्भात हलचाली सुरु केल्या. मात्र उदय यांना हे पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत असं सांगितलं. फसवणूक करणाऱ्या महिलेने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आहे असं पीडित व्यक्तीला सांगितलं. हा स्कोअर सुधारण्यासाठी अधिक पैसे लागतील असं सांगून उदय यांच्याकडून पुन्हा पैसे घेण्यात आली. त्यानंतर त्यांना एका व्हीआयपी चॅनेलमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं.
अचानक खात्यावरुन 61.5 लाख रुपये काढले
मात्र अनेकदा प्रयत्न करुनही पैसे परत देण्याऐवजी चालढकल केली जात असल्याचं उदय यांना जाणवलं. अचानक उदय यांना त्यांच्या बँक खात्यावरुन 61.5 लाख रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर उदय यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
अशा मेसेजवर क्लिक करु नका
कोणत्याही अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या मेसेजवर क्लिक करु नका असं अनेकदा सायबर सुरक्षेसंदर्भातील तज्ज्ञ सांगतात. मात्र कमी वेळात अधिक पैसे कमवण्याच्या लालसेपोटी अशा अमिषांना बळी पडतात आणि स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात.