( प्रगत भारत । pragatbharat.com)
संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अनेकदा या भांड्याचा आवाज घराबाहेर पडतो आणि हे क्लेष सर्वांसमोर उघड होतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमधील असाच एक वाद सध्या चर्चेत आहे. या वादात पतीने पोलीस स्टेशन गाठलं असता पोलीसही त्याचं गाऱ्हाणं ऐकून चक्रावले. याचं कारण पत्नीला गुटख्याचं व्यसन असल्याने पती त्रस्त होता. पत्नी गुटखा खाऊन घरभर थुंकत असल्याचा त्याचा आरोप होता.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माहेराहून सासरी नेत नसल्याने नाराज पत्नी समुदेशन केंद्रात पोहोचली होती. तिने मदतीसाठी आवाज दिला आहे. तिन्ही तारखांमध्ये तडजोड न झाल्याने पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली. हरी पर्वत ठाणे क्षेत्राच्या जीवन मंडी येथे हा सगळा प्रकार घडला आहे. 8 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं.
समुपदेशक डॉक्टर अमित गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचा बुटांचा व्यवसाय आहे. त्याचं म्हणणं आहे की, पत्नी गुटखा खाऊन घरातच थुंकत होती. ती स्वत: दुकानातून गुटखा खरेदी करुन आणत असे. ती कोणालाही आदर देत नव्हती. याचमुळे नाराज होऊन आपण तिला माहेरी पाठवलं होतं.
दरम्यान पत्नीने आपण गुटख्याचं सेवन करत असल्याचं मान्य केलं आहे. पण आपण सर्वासमोर गुटखा खात नसल्याचं तिचं म्हणणं आहे. तसंच घराच्या स्वच्छतेवर आपण लक्ष घेत असल्याचं तिने सांगितलं आहे. आरोप आहे की, पतीने लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला माहेरी पाठवलं होतं. यानंतर तो कधीच तिला नेण्यासाठी आला नाही. पत्नी गेल्या 6 महिन्यांपासून माहेरी आहे.
पहिल्या तारखेला दोघांमध्ये तडजोड झाली होती. पत्नीने गुटखा न खाण्याचीही तयारी दर्शवली होती. पण नंतर पुन्हा त्यांच्यात याच मुद्द्यावरुन भांडण झालं होतं. यानंतर तीन तारखा देण्यात आल्या पण दोघांमध्ये तडजोड झाली नाही.