( प्रगत भारत । pragatbharat.com)
Odisha Train Accident: ओडिशामधील रेल्वे दुर्घटनेनंतर (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत 288 प्रवासी ठार झाले असून 1100 जण जखमी झाले आहेत. सध्या संपूर्ण देशात ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याची चर्चा सुरु आहे. रेल्वे मंत्रालयानेही दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरु केली असून, सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला आहे. दुर्घटनेसंबंधी अनेक अंदाज बांधले जात असताना एका साक्षीदाराने धक्कादायक खुलासा केला आहे.
Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला ‘तो’ अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला “मी जिवंत…”
बालासोरमध्ये ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तेथून 20 मीटर अंतरावर राहणाऱ्या मेडिकलचा मालक सौभाग्य रंजन सारंगी याने दावा केला आहे की, दुर्घटना घडली तेव्हा रेल्वे क्रॉसिंगवर दुरुस्तीचं काम सुरु होतं. ट्रॅकवर 10 ते 15 गेटमन होते.
गेल्या 2 महिन्यांपासून सुरु होतं काम
गेल्या दोन महिन्यांपासून काम सुरु होतं असा दावा या 25 वर्षीय तरुणाने केला आहे. गेटमनच्या खोलीचं बांधकाम सुरु होतं. दुर्घटना घडली त्या दिवशीही रेल्वे क्रॉसिंगवर काम सुरु होतं असं त्याने सांगितलं आहे.
‘आज तक’शी बोलताना साक्षीदार दुकानदाराने सांगितलं की, मी रोज दुकान बंद करुन जाताना बांधकाम सुरु असल्याचं पाहत होतो. तिथे रेल्वेचंचं काम सुरु होतं. साक्षीदाराच्या दाव्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून ट्रॅकच्या रुंदीकरणाचं काम सुरु होतं.
2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात तीन ट्रेनमध्ये धडक होऊन भीषण दुर्घटना झाली. बहनागा बाजार स्टेशनजवळ SMVB – हावडा एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीत धडक झाली. या दुर्घटनेत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 1100 हून अधिक जण जखमी आहेत.
कशी झाली दुर्घटना?
पश्चिम बंगालच्या कोलकातामधील हावडा स्टेशन आणि तामिळनाडूच्या चेन्नईपर्यंत कोरोमंडल एक्स्प्रेस चालवली जाते. दुर्घटनेत 15 डबे ट्रॅकवरुन खाली उतरले होते. यामधील 7 डबे पूर्णपणे पलटी झाले होते. रेल्वे बोर्डाने चालकांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सिग्नलमध्ये गडबड झाल्याने ही दुर्घटना घडली. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाने आपण सिग्नल पाहूनच ट्रेन पुढे नेली असा दावा केला आहे. तर यशवंतपूर एक्स्प्रेसच्या चालकाने आपण विचित्र आवाज ऐकल्याचं सांगितलं आहे. या दुर्घटनेचा कोरोमंडल एक्स्प्रेसला सर्वाधिक फटका बसला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून त्यानंतरच या दुर्घटनेमागील खरं कारण समोर येईल.