( प्रगत भारत । pragatbharat.com)
Milind Deora joining Shinde group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी रविवारी सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले Milind Deora ?
माझे प्रिय मतदार बंधूभगिनी, मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला, हे जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणूनच मी माझी भूमिका आपल्या समोर मांडत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वर्षे लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसच्या पराभवानंतर मी काही धाडसी सुधारणांची तसंच त्यांच्या परिणामांना उत्तरदायी राहण्याची सूचना केली होती. २०१९ मध्ये – मतदानाच्या फक्त १ महिना आधी नेमणूक झाली असूनही मी निवडणुकीतील पराभवाचं संपूर्ण दायित्व स्वीकारलं आणि माझ्या पदाचा राजीनामा दिला. मला असं वाटतं की मी जेव्हा दायित्व स्वीकारलं होतं तेव्हाच पक्षात घडलेल्या घटनांबाबत जाब विचारण्याचा अधिकारही माझ्याकडे आपोआपच आला होता.
काँग्रेसशी बांधिलकी कायम होती पण…
२०१९ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच्या युतीला विरोध केला होता, कारण त्याचा काँग्रेसवर घातक परिणाम होण्याची शक्यता होती. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारेपेक्षा वैयक्तिक फायद्याला प्राधान्य दिलं जात होतं आणि मी गेली चार वर्षे कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी सातत्याने सावधगिरी बाळगण्याचा आग्रह धरला होता. मला सातत्याने बाजूला सारले गेले असले तरी गांधी घराण्याशी आणि काँग्रेसपक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले नाते कायम राखण्यासाठी माझी पक्षाशी बांधिलकी कायम राहिली. एक दशक मी वैयक्तिक पद किंवा सत्ता न मागता पक्षासाठी विविध भूमिकांमध्ये अथक परिश्रम केले.
देशद्रोही कोण?
खेदाची बाब म्हणजे माझे वडील मुरलीभाई आणि मी अनुक्रमे १९६८ आणि २००४ मध्ये ज्या पक्षात प्रवेश केला होता, त्या कॉंग्रेस पक्षाची आणि आजच्या काँग्रेसची सद्यस्थिती जुळत नाही. प्रामाणिकपणा आणि विधायक टीकेबद्दल कदर बाळगण्याचा अभाव असल्यामुळे वैचारिक आणि संघटनात्मक मुळापासून ते विचलित झाले आहेत. एकेकेळी भारताच्या आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करणारा हा पक्ष आता औद्योगिक घराण्यांना ‘देशद्रोही’ ठरवतो आहे. भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि धर्म साजरे करण्याऐवजी जातीच्या आधारे फूट पाडणे आणि उत्तर-दक्षिण अशी दरी निर्माण करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. केवळ सत्ता मिळवण्यातच नव्हे, तर केंद्रात विधायक विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करण्यातही त्यांना अपयश आले आहे.
राजकीय निर्णय
२० वर्षांनंतरही मुंबई, महाराष्ट्र आणि भारताच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे आणि भारत माझी मातृभूमी आहे. मुंबईच्या नागरिकांचे कल्याण हे माझ्यासाठी राजकीय बांधिलकीच्या पलीकडचे आहे, म्हणून मी एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेत आहे. माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीप्रमाणे धर्म, जात किंवा आर्थिक स्थितीची पर्वा न करता लोकसेवा करण्यासाठी माझा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य वापरण्याचे माझे ध्येय आहे.
मुख्यमंत्र्यांचं कौतूक
आज आपण पाहतो की, भारताला प्रगतीशील करून जागतिक क्रमवारीत तिसरा बनविण्याचा ध्यास घेतलेला आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान हा एकेकाळी चहावाला होता तसेच ‘भारताची आर्थिक राजधानी असलेल्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणारा कधीकाळी रिक्षाचालक होता. नेत्तृवातील हे परिवर्तन भारताच्या राजकीय संस्कृतीला समृद्ध करते आहे, लोकशाहीच्या समतावादी मूल्यांना पुष्टी देते आहे. एकनाथ शिंदे हे देशात सर्वात मेहनती, समाजात सहज मिसळणारे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील वंचित घटकांबद्दलची त्यांची समज तसेच प्रशासन आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत.
राष्ट्रीय दृष्टीकोन
एमटीएचएल, कोस्टल रोड, मुंबई मेट्रो आणि एनएमआयए सारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा असलेल्या प्रकल्पांची जलद अंमलबजावणी तसेच प्रभावी प्रशासन आणि विकासाला चालना देण्यासाठी, मुंबईचा कायापालट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या समृद्ध भवितव्याची त्यांची दूरदृष्टी मला भावते आणि त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा माझा हेतू आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा ‘भारतासाठी दूरदर्शी दृष्टीकोन मला त्यांच्या राष्ट्रीय दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरित करतो.
माझ्या कुटुंबाच्या ५५ वर्षांच्या काँग्रेस सोबत असलेल्या राजकीय संबंधांनंतर, विभक्त होण्याचा माझा निर्णय भावनिक दृष्टीने कठीण आहे. रचनात्मक विचारांना महत्त्व देणाऱ्या, माझ्या कर्तुत्वाला सन्मान देणाऱ्या आणि आपल्या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी संसदेत माझ्या कार्यक्षमतेचा उपयोग करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या नेत्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. एकनाथ शिंदे यांचा माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास असून कठोर परिश्रमातून अशक्यप्राय गोष्ट साध्य होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांचा वारसा
बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाने प्रेरित होऊन आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून मी मुंबईकरांचे आणि सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख राजकारणासाठी कटिबद्ध आहे. मी मनापासून तुमचे समर्थन आणि आशीर्वाद मागतो, तसंच माझी भूमिका समजून घ्याल अशी आशा बाळगतो. मी सर्वांना आमंलण देतो की, कोणत्याही एका राजकीय पक्षनिष्ठेच्या जाळ्यात न अडकता, राष्ट्रउभारणीच्या ध्यासाने प्रेरित होऊन, आपण एका प्रगतशील तसेच सुरक्षित मुंबई आणि मजबूत ‘भारताच्या उभारणीसाठी एकल येऊया, असं मिलिंद देवरा पत्रात म्हणाले आहेत.