Republic Day: स्वातंत्र्याच्या 20 वर्ष आधीपासूनच 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन; कारण फारच रंजक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Why Republic Day Is Celebrated On 26 January: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. दरवर्षी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? इतर कोणत्याही दिवसाऐवजी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो यामागे फारच रंजक किस्सा आहे. त्याचसंदर्भात आपण जाणून घेऊयात…

1930 पासून साजरा होतोय प्रजासत्ताक दिन

यावर्षी भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजपासून 74 वर्षांपूर्वी म्हणजे 1950 साली 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी स्वतंत्र भारतामध्ये संविधान लागू झालं. 26 जानेवारीच्या दिवशीच संविधान लागू करण्यामागे एक खास कारण होतं. 1930 साली भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याचा ठराव संमत केला होता. इतिहासाच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, 1929 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि नंतर भारताचे पहिले पंतप्रधान झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय काँग्रेसने एक महत्त्वाची घोषणा केली होती.

इंग्रज सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमनियन स्टेटचा दर्जा द्यावा आणि याच दिवशी पहिल्यांदा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी या घोषणेद्वारे करण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. पूर्ण स्वराज्य देण्याच्या मागणीनंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. त्यामुळे हाच दिवस देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

308 जणांची स्वाक्षरी

देशातील कारभार ठरवून दिलेल्या नियमांनुसार चालावा म्हणून प्रत्येक देश एक नियमावली तयार करतो. वेगवेगळ्या देशांमध्ये या नियमावलीला वेगवेगळं नाव दिलं जातं. भारतामध्ये या नियमावलीला ‘संविधान’ असं म्हणतात. भारताचं संविधान डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलं आहे. त्यांनी संविधानाचा मसूदा तयार केला. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. यानंतर एक समिती तयार करुन संविधानाबद्दलची सविस्तर चर्चा झाली.

कमिटीमध्ये एकूण 308 सदस्य होते त्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानला कायदा म्हणून मंजूरी दिली. संविधानाच्या दोन प्रतींवर कमिटीमधील सर्वच्या सर्व 308 सदस्यांनी संमत असल्यासंदर्भातील स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर संविधानला देशाचा कायदा म्हणून मान्यता मिळाली.

पूर्वी आठवडाभर साजरा व्हायचा प्रजासत्ताक दिन

आज आपण 26 जानेवारीचा एकच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आठवडा सेलिब्रेशन केलं जायचं. 24 जानेवारीपासूनच हे सेलिब्रेशन सुरु व्हायचं. पहिल्या दिवशी लहान मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन सन्मानित केलं जायचं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीच्या सायंकाळी देशाचे राष्ट्रपती देशातील जनतेला संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राजपथावर पडेच्या माध्यमातून भारताच्या एकतेचं दर्शन होतं.  

Related posts