( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral News: ग्रंथालय म्हणजे वाचकांचं आवडतं ठिकाण. ग्रंथालयाचं सदस्यत्व घेतलं की आपल्या हाती पुस्तकांचा खजिनाच लागतो. यामुळे याठिकाणी वाचकांची मोठी वर्दळ दिसते. पण ग्रंथालयातून पुस्तक वाचण्यासाठी घेतलं तर त्यांच्या नियमाप्रमाणे ठराविक कालावधीत ते परत करावं लागतं. जर त्यापेक्षाही जास्त काळ तुम्ही पुस्तक स्वत:कडे ठेवलं तर दिवसाप्रमाणे दंड लावला जातो. पण जर एखाद्या व्यक्तीने 81 वर्षांनी पुस्तक परत केलं तर…ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण नुकतीच अशी एक घटना घडली आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील एबरडीन येथील हे प्रकरण आहे. येथे एक व्यक्ती ग्रंथालयात पुस्तक परत करण्यासाठी आला असता कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. याचं कारण हे पुस्तक 30 मार्च 1942 रोजी देण्यात आलं होतं. म्हणजेच तब्बल 81 वर्षांनी हे पुस्तक परत करण्यात येत होतं.
जुन्या सामानात मिळालं पुस्तक
ग्रंथालयाने आपल्या फेसबुक पेजवर माहिती दिली की, चार्ल्स नॉरडॉफ आणि जेम्स नॉर्मन हॉल यांचं पुस्तक “द बाउंटी ट्रिलॉजी” 81 वर्षांनी एबरडीन टिम्बरलैंड ग्रंथालयात परत आलं आहे. ग्रंथालयाचं हे पुस्तक जुन्या सामानात सापडलं.
पान क्रमांक 17 वर लिहिलं होतं असं काही
KIRO7 न्यूजने दिलेल्या रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीने हे पुस्तक घेतलं होतं तो फक्त 17 पानंच वाचू शकला होता. त्याने 17 व्या पानावर लिहिलं होतं की “मला जर कोणी पैसे दिले तरी मी हे पुस्तक वाचणार नाही”. थोडक्यात आपल्याला हे पुस्तक अजिबात आवडलं नसल्याचं त्यांना सांगायचं होतं.
दंड आकारला तर किती रक्कम होईल?
पुस्तक ग्रंथालयात उशिरा जमा केल्याचा दंड आकारला तर किती रक्कम होईल असा विचार तुम्हीही करत असाल ना. ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांनी हिशोब केला असता रविवार आणि सुट्ट्या सोडल्या तर दिवसाला 2 सेंटच्या हिशोबाने तब्बल 484 डॉलर्स म्हणजेच 40 हजार रुपये दंड होतो. करोना महामारीत ग्रंथालयाने लेट फी रद्द केली होती.
दरम्यान ग्रंथालयाने आपण दंड आकारणार नसल्याचं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांना मजेशीरपणे पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “यावरुन तुम्हाला काय शिकायला मिळतं? जर तुमच्याकडे घेतलेलं पुस्तक धूळ खात पडलं असेल तर ते ग्रंथालयात परत करा”. दरम्यान आम्ही हे पुस्तक एक गिफ्ट म्हणून सोबत ठेवत आहोत आणि कोणताही दंड आकारणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.