Russia Ukraine War : ‘…तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल’, एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Elon Musk On Vladimir Putin : गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून शांततेची स्थिती असताना रशियाने युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्रं डागली. यासह 36 ड्रोन हल्ले देखील केल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशावरून झालेल्या हलल्यामध्ये 27 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अशातच आता दोन्ही देशातील युद्ध कधी थांबणार? असा सवाल विचारला जातोय. प्रकरण गंभीर होत असताना आता स्पेस एक्सचे मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय.

काय म्हणाले Elon Musk ?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आता युक्रेनविरुद्ध पुकारलेलं युद्ध रोखता येणार नाही. परिस्थिती व्लादिमीर पुतिन यांच्या हाताबाहेर गेली आहे. जर व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या देखील होऊ शकते, अशी खबळबजनक भविष्यवाणी एलॉन मस्क यांनी केली आहे. आणखी काही शक्ती आहेत ज्या पुतिन यांना युद्ध सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकत आहेत आणि हे फार मुर्खपणाचे ठरेल, असंही एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

अनेक जणांनी माझ्यावर पुतिन समर्थक असल्याचा आरोप केला आहे. मात्र, हे आरोप खोटे आहेत. माझ्या कंपन्यांनी रशियाला कमकुवत करण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले आहेत आणि त्यांनी माझं खूप नुकसान देखील केलंय. माझ्या कंपनीने रशियाविरुद्ध जेवढं काम केलंय. तेवढं इतर कोणीही केलं नाही, असं एलॉन मस्क म्हणाले. त्यावेळी त्यांनी स्टारलिंक इंटरनेट सेवेचा देखील उल्लेख केला.

एक्स पोस्टवर चर्चेत भाग घेतलेल्या खासदारांमध्ये विस्कॉन्सिनचे रॉन जॉन्सन, ओहायोचे जेडी व्हॅन्स, उटाहचे माईक ली, विवेक रामास्वामी आणि क्राफ्ट व्हेंचर्सचे सह-संस्थापक डेव्हिड सॅक्स यांचा समावेश होता. विस्कॉन्सिनचे खासदार रॉन जॉन्सन यांनी मस्क यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आणि युक्रेनला विजय मिळवणं म्हणजे दिवास्वप्न असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांना दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेमुळे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. अमेरिकेनेच युक्रेनला चिथावलं, असा आरोप व्लादिमीर पुतिन यांनी केलाय. त्यामुळे आता पुतिन यांनी थेट अमेरिकेला शिंगावर घेतल्याने येत्या काळात अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाद चांगलाच पेटू शकतो.

Related posts