Non-Communicable Diseases, सावधान! भारतीयांमध्ये वेगाने वाढतायत हे आजार; नव्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर – high blood pressure diabetes cholesterol levels have increased

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आयसीएमआर’ने ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच ते सहा टप्प्यांत तब्बल १२ वर्षे केलेल्या अभ्यासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याच अभ्यासात जवळजवळ निम्म्या जनतेमध्ये स्थूलता आढळून आली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलचे प्रमाणही जनतेमध्ये कितीतरी जास्त प्रमाणात आढळून आले आहे. विशेष म्हणजे हे निष्कर्ष एक लाख १३ हजार ४३ व्यक्तींच्या अभ्यासावरून काढण्यात आले आहेत आणि यातील ७९ हजार ५०६ व्यक्ती (सुमारे ७० टक्के) या ग्रामीण भागातील, तर ३३ हजार ५३७ व्यक्ती या शहरी भागातील आहेत. याचाच अर्थ असांसर्गिक आजारांचे प्राबल्य शहरांबरोबरच ग्रामीण भागांमध्येही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माध्यमातून हा विविधस्तरीय अभ्यास करण्यात आला आहे आणि अलीकडेच हे सर्व निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हा अभ्यास १८ ऑक्टोबर २००८ ते १७ डिसेंबर २०२० या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये करण्यात आला आहे. या विस्तृत अभ्यासामध्ये मधुमेह ११.४ टक्के व्यक्तींमध्ये, मधुमेह पूर्वस्थिती १५.३ टक्के, उच्च रक्तदाब ३५.५ टक्के, सर्वसाधारण स्थूलता २८.६ टक्के, पोटाभोवतीची स्थूलता ३९.५ टक्के, डिस्लिपिडेमिया म्हणजेच रक्तातील लिपिड पातळी वाढण्याचे प्रमाण ८१.२ टक्क्यांपर्यंत आढळून आले आहे. त्यामुळे मधुमेहासह सर्वच असांसर्गिक आजारांचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढत असल्याची नोंद जवळपास सर्वच राज्यांमध्ये झाली आहे. त्याचवेळी असांसर्गिक आजारांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने धोरणे आखणे ही काळाची गरज आहे, असाही निष्कर्ष ‘आयसीएमआर’च्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

व्याधीजन्य जीवनशैलीचा फटका

या अभ्यासातील निष्कर्ष हे अत्यंत खराब जीवनशैली व आहारशैलीचे द्योतक आहेत, असे सांगताना मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. मयुरा काळे म्हणाल्या, ‘मुळात व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे आणि योग्य व अपेक्षित पद्धतीने व्यायाम करणारे आणखी कमी आहेत. त्याशिवाय शारीरिक हालचालही खूप कमी झाली आहे. एकाच जागी बसून राहणे, गॅजेझटसला चिकटून राहणे, हा प्रकार खूप जास्त वाढत आहे आणि हे लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्रास दिसून येत आहे. पुन्हा फास्ट फुड, जंक फुडचा अतिरेकही दिसून येत आहे.’

२५ ‘बीएमएम’पुढे स्थूलत्व

‘पाश्चात्य देशांमध्ये ३० ‘बीएमआय’च्या पुढे स्थुलत्व मानण्यात येते; परंतु भारतीयांमध्ये २५ ‘बीएमआय’च्या पुढे स्थुलत्व मानण्यात येते. मुळात अनेक भारतीयांचा सर्वसाधारण ‘बीएमआय’ मर्यादेत असतो; परंतु पोटाचा घेर खूप जास्त असतो. हात-पाय बारीक व पोटाचा घेर जास्त, असे व्यक्तिमत्व सर्रास पाहायला मिळते. त्यामुळेच २५ पेक्षा जास्त ‘बीएमआय’ हा भारतीयांच्या बाबतीत स्थुलत्व मानण्यात येत आहे,’ असेही डॉ. मयुरा काळे म्हणाले.

स्थूलत्व हेच मुख्य कारण

खरे म्हणजे बहुतांश असांसर्गिक आजारांसाठी वाढलेले वजन व स्थुलत्व कारणीभूत ठरत आहे. एकीकडे शारीरिक हालचाल, व्यायामाचे प्रमाण अत्यल्प झालेले असताना, दुसरीकडे अनारोग्य पद्धतीची आहारशैली खूप जास्त प्रमाणात वाढली आहे.
देशातील मधुमेह रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी; ‘लॅन्सेट’ अहवालातून माहिती समोर, सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात?
याच अभ्यासात ८१ टक्के व्यक्तींमध्ये लिपिड पातळी वाढलेली आढळून आली आहे. साहजिकच कोलेस्टेरॉल व इतर त्रासदायक घटक खूप जास्त प्रमाणात वाढून हृदयरोगांचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे जीवनशैली व आहारशैली बदलण्याशिवाय पर्याय नाही, हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे.- डॉ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ

प्रत्येकाचा सरासरी स्क्रीन टाइम ४ ते ५ तास होत आहे. त्यामुळे एकाच जागी बसून राहण्याचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. खरे म्हणजे सध्या उन्हाळी सुट्या सुरू आहे, पण किती मुले मैदानावर खेळत आहे, हे लक्षात घेतले तर परिस्थिती स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही.-डॉ. अनंत कुलकर्णी, फिजिशियन

[ad_2]

Related posts