Mahashivratri 2024 Video : महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात पार पडली खास आरती; पाहा गर्भगृहातील भारावणारे क्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाची लाट पाहायला मिळत असून, देसभराती अनेक शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गुरुवारी रात्रीपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. अनेकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देशातील 12 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रीसुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या या अतिशय पवित्र पर्वानिमित्त मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असणाऱ्या श्री महाकालेश्वर मंदिरातही उत्साह पाहायला मिळाला. 

शुक्रवारी भल्या पहाटे, या मंदिरात आणि मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी मंदिरात आरती संपन्न झाली. पंचारतीच्या ज्वाळांमुळं पडणाऱ्या उजेडामुळं महाकालेश्वर मंदिराचं गर्भगृह प्रकाशमान झालं. श्री महाकालेश्वरांच्या शिवलिंगावर केलेली सजावट या प्रकाशामध्ये मन मोहताना दिसली. डमरूंच्या नादासह शिव शिंभो, हर हर महादेव अशा नादामुळं मंदिर आणि नजीकचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान पहाटेच्या पहिल्या आरतीआधी महालाकेश्वराच्या शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि त्यानंतर भस्मलेपन करत भस्मारतीसुद्धा पार पडली. इथं महाराष्ट्रातही ज्योतिर्लिंग क्षेत्रांवर भाविकांची रिघ पाहायला मिळाली. हिंगोलीच्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ इथं महाशिवरात्री निमित्त मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली. मध्यरात्री साडेबारा वाजता देवस्थानचे तहसिलदार हरीश गाडे आणि आमदार संतोष बांगर यांच्या महापूजा केली. पूजेनंतर रात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं.

भीमाशंकरमध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर महाशिवरात्री यात्रा उत्सव सुरू झाला. महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसर आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वराचं मंदिर सलग 41 तास सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.

कोकणातही महाशिवरात्रीचा उत्साह

कोकणातील काशीक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या श्री कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई नेहमीच लक्षवेधी ठरत असते. आंगणेवाडीप्रमाणे या जत्रोत्सवात देखील राजकीय नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळते.

Related posts