‘तवायफ’ म्हणजे देहविक्री करणाऱ्या नव्हे! श्रीमंतांची मुलं ज्यांच्याकडे संस्कार शिकण्यासाठी जात ‘त्या’ कोण होत्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारलेली पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भन्साळी यांच्या चित्रपटांकडून असणाऱ्या कैक अपेक्षा या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक पाहून लक्षात आलं आणि ‘हीरामंडी’ म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. 

‘हीरामंडी’ हा एक उर्दू शब्द असून, त्याचा शब्दश: अर्थ होतो हिऱ्यांचा बाजार. पारिस्तानातील लाहोर येथे याच नावाचा एक प्रांतही असल्याचं सांगितलं जातं. ‘हीरामंडी’चा ट्रेलर पाहताक्षणी ‘तवायफ’ आणि त्यांच्या आयुष्याच्या भोवती फिरणारे अनेक प्रसंग कलात्मक पद्धतीनं साकारण्याकत आले असून त्यातूनच कथानक पुढं उलगडत जाणार असल्याचं कळत आहे. पण, मुळात या ‘तवायफ’ / नर्तकी किंवा गायिका आहेत कोण? जनमानसात तयार झालेली त्यांची प्रतिमा मुळात तशी नाहीये हे तुम्हाला माहित आहे का? 

सबा देवान यांच्या Tawaifnama या पुस्तकातून यासंदर्भातील अतिशय रंजक माहिती मांडण्यात आली आहे. ही माहिती वाचताना काळानुरूप काही संकल्पना नेमक्या किती बदलल्या याचाही अंदाज येतो. या पुस्तकातील आणि काही इतर संदर्भांतील माहितीनुसार मुघलांच्या काळात तवायफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलांकडे बरेच अधिकार होते. त्या काळात करदात्या भारतीयांमध्ये याच महिला सर्वाधिक कर देत होत्या असे संदर्भ ब्रिटीश अहवालांमध्ये आढळतात. 

त्या काळातील ‘परदाबंद’ महिलांना शह देत या तवायफ राजकारण, साहित्यासंदर्भात ज्ञान होतं. शहरातील उच्चभ्रू आणि धनाढ्य मंडळींनाच त्यांच्या ‘कोठ्यां’मध्ये प्रवेश होता. फक्त आणि फक्त श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठीच त्यांच्या कार्यक्रमांचं आयोदन केलं जात असे. 

आश्चर्याची बाब म्हणजे याच तवायफ म्हणून समाजानं एकेकाळी हिणवलेल्या महिलांनी गतकाळात राजेमहाराजांना गरज भासली तेव्हातेव्हा आर्थिक सहाय्य केल्याचेही संदर्भ आढळतात. या महिला मंदिर, उत्सवांमध्येही त्यांची कला सादर करत. इतकंच नव्हे तर त्यांचे कलाविष्यार कैकदा देवाला समर्पित असत. समाजातील काही प्रतिष्ठीत कुटुंबातील मंडळी त्या काळात त्यांच्या मुलांना ‘आदाब’ आणि ‘तहजीब’ शिकवण्यासाठी पाठवत असत. भारतीय कलाजगतामध्ये अभिनेत्री नर्गिस यांची आई, ‘जद्दानबाई’ या पहिल्या नावारुपास आलेल्या तवायफ महिलांपैकीच एक होत्या. 

लढवय्या, निष्णात आणि प्रतिष्ठीत महिला असंच त्यांचं स्वरुप त्या काळात समाजात रुजलं होतं. त्या काळात त्यांच्यावर लग्नासाठी किंवा मुलाबाळांसाठी कोणतीही बळजबरी नसे. पण, ब्रिटीशांचा काळ येताच   तवायफ आणि देहविक्री करणाऱ्या महिलांमधील फरक कमी झाला आणि इथंच समाजातील ‘तवायफ’ समाजानं वाळीत टाकली. 

Related posts