( प्रगत भारत । pragatbharat.com)
UP Road: निवडणुकींपूर्वी राजकारणी मोठमोठी आश्वासने देऊन मत मागायला येतात पण निवडून आल्यावर त्यांना सर्वाचा विसर पडतो, हे प्रत्येकाच्या गावात झाले असेल. गावच्या विकासासाठी नेत्यांची वारंवार वेळ घ्यावी लागते, त्यांचे खूपच आदरतिथ्य करावे लागते. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील गावकऱ्यांना असाच काहीसा अनुभव आला. यावर त्यांनी शक्कल शोधून काढली. हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून रस्ता बांधला.
जनतेचा रोष इथेच थांबला नाही. नेत्यांना धडा शिकवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर एक फलकही लावला आहे. ‘लोकांच्या वर्गणीच्या पैशातून हा रस्ता बांधला गेला आहे, त्यामुळे स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या लोकांनी इथे मत मागायला येऊ नये’, असा फलक तिथे लावण्यात आला. आता हाथरसचे हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे प्रकरण हाथरसच्या मुर्सन गेट भागातील रामा प्रेस स्ट्रीट येथे घडले आहे. आपल्या गल्लीतील रस्ता तयार करावा, अशी मागणी येथील नागरिक नगरपरिषद आणि इतर लोकप्रतिनिधींकडे अनेक दिवसांपासून करत होते. त्यासाठी नेत्यांच्या कार्यालयांना आणि नगरपरिषदेला लोकांनी वारंवार भेटी दिल्या. सर्व प्रयत्न करूनही काम न झाल्याने लोकांनी स्वत:हून रस्ता बांधून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लोकांनी कंत्राटदाराची निवड केली. तसेच अपेक्षित खर्चाची माहिती गोळा केली.
गटार आणि पथदिवे करण्यासाठी निधी
रस्ता तयार केल्यानंतर आरसीसी टाकणे आणि इंटरलॉक करणे यासाठी 40 हजार रुपये खर्च येणार होता. यासाठी अनेक लोकांनी स्वत:हून दान दिले आणि पैसे गोळा झाले. रस्त्याच्या तुटलेल्या भागावर आरसीसी टाकून उर्वरित भागात इंटरलॉकिंगचे काम करण्यात आले. यापूर्वी येथील नागरिकांनी स्वत:च्या पैशातून सीवर लाइन टाकली होती, त्यात 30 हजार रुपये खर्च करण्यात आले होते. हा पैसाही देणगीतून उभा करण्यात आला होता.
गटारे आणि रस्त्यांची कामे नागरिकांनी स्वत: करून घेतली. त्यात लोकप्रतिनिधींनी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या फलकातून संताप व्यक्त केला आहे. या फलकावर ‘गल्लीतील लोकांच्या पैशातून हा रस्ता बांधण्यात आला आहे. कृपया लोकप्रतिनिधींच्या नावाने मते मागायला येऊ नका. आम्ही स्वत:च्या पैशातून हा रस्ता तयार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, त्यामुळे राजकारण्यांना येथे येणे नागरिकांना मान्य नाही.