( प्रगत भारत । pragatbharat.com)
Madhya Pradesh News : वंदे भारत ट्रेनला (vande bharat express) देशभरात प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जलद आणि सुखकर प्रवास यामुळे प्रवासी वंदे भारत ट्रेन ट्रेनला प्राधान्य देत आहेत. मध्य प्रदेशात विचित्र प्रकार घडला आहे. भोपाळ रेल्वे स्थानकात एक प्रवाशी लघुशंका करण्यासाठी थेट वंदे भारत ट्रेनमध्ये चढला. तो टॉयलेटमधून बाहेर आल्यावर ट्रेनचे दरवाजे लॉक झाले होते. यामुळे हा व्यक्ती थेट भोपाळहून थेट 194 KM लांब असलेल्या उज्जैन रेल्वे स्थानकात पोहचला. या सगळ्या प्रकारात या व्यक्तीला सहा हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागला.
अब्दुल कादिर (वय 42 वर्षे) असे या प्रवाशाचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या सिंगरौलीच्या बैधानमध्ये राहणाऱ्या अब्दुल कादिर यांचे हैदराबादच्या बेगम बाजारमध्ये जफरन हाऊस नावाचे ड्रायफ्रूटचे दुकान आहे. सिंगरौली येथे देखील त्यांचे सुकामेव्याचे दुकान आहे. 14 जुलै रोजी अब्दुल कादिर हे पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलासह दक्षिण एक्सप्रेस ट्रेनने हैदराबादहून सिंगरौलीकडे निघाले. दक्षिण एक्सप्रेस ट्रेनमध्ये सेकंड एसी कोचमध्ये त्यांचे तिकीट बुकींग होते.
इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ते लघुशंकेसाठी गेले
15 जुलै रोजी सायंकाळी 5.20 वाजता ते पत्नी आणि मुलाला घेवून भोपाळ स्टेशनवर पोहोचले. रात्री 8.55 वाजता सिंगरौलीकडे जाणारी ट्रेन सुटणार होती. मात्र, ट्रेन 2 तास लेट होती. यामुळे अब्दुल यांनी पत्नीला घेवून बाहेर जेवायला जाण्याचा विचार केला. तिघेही भोपाळ रेल्वे स्थानकावर उतरले. दरम्यान, अब्दुल यांना लघुशंकेसाठी जायचे होते. यामुळे दुसऱ्या फलाटावर उभ्या असलेल्या इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ते लघुशंकेसाठी गेले.
वंदे भारत ट्रेनचे दरवाजे लॉक झाले
7:24 मिनिटांनी अब्दुल कादिर इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेले. 7.25 मिनिटांनी ते टॉयलेटमधून बाहेर आले. मात्र, ट्रेनचे दरावाजे लॉक झाले होते. काही सेकंदात ट्रेन सुरु देखील झाली.
रेल्वे पोलिस आणि TC कडे मदत मागितली
वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यामुळे अब्दुल कादिर यांनी रेल्वे पोलिस आणि TC कडे मदत मागितली. मात्र, वंदे भारत ट्रेन ऑटोमॅटिक असल्यामुळे फक्त ट्रेनचा चालकच दरवाजे उघडू शकतो असे रेल्वे पोलिस आणि TC यांनी सांगितले. यामुळे अब्दुल कादिर यांनी थेट मोटरमनच्या केबिनकडे जाण्याचा प्रयत्न केला.
ट्रेन चुकली आणि दंडही भरावा लागला
अब्दुल कादिर हे लघुशंकेसाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढल्याचे टीसीला समजल्यानंतर त्यांच्याकडून तिकीटसह 1200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. भोपाळ रेल्वेस्थानकावर अब्दुल कादिर यांची पत्नी आणि मुलगा वाट पाहत होते. यामुळे 800 रुपयांचे तिकीट काढून ते बसने उज्जैनला आले. यादरम्यान त्यांची सिंगरौली येथे जाणारी ट्रेन चुकली. यामुळे त्यांच्यासह पत्नी आणि मुलाचे मिळून तब्बल 6 हजार रुपयांचे तिकीट ट्रेन न पकडल्यामुळे फुकट गेले.