( प्रगत भारत । pragatbharat.com)
Video Get Rahul Married Sonia Gandhi Responds: हरियाणामधील काही शेतकरी महिलांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची (Sonia Gandhi) दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान या महिलांपैकी एकीने, ‘राहुलचं लग्न करुन टाका’ अशी गळ सोनियांकडे घातली. या महिलेनं मुलाबद्दल केलेलं हे विधान ऐकून सोनिया गांधींनीही या महिलेला ‘तुम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधा,’ असं म्हटलं. सोनिया गांधींचं हे विधान ऐकून सर्वच महिला हसू लागल्या. काही शेतकरी महिलांनी सोनिया गांधींबरोबरच प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही (Rahul Gandhi) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या महिलांना सोनिया गांधींनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान या महिलांना जेवणासाठी घरी येण्यास सांगितलं होतं. आपला दिलेला शब्द पाळण्यासाठी राहुल गांधींनी काही महिला शेतकऱ्यांना आपल्या आईच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं. या सर्वांनी मिळून भोजनाचा आस्वाद घेताना बऱ्याच विषयांवर गप्पाही मारल्या.
राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा
सोनिया गांधींच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी ही लंच पार्टी पार पडली. यावेळेस एका महिलेने सोनिया गांधींच्या कानात अगदी सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात, ‘राहुलचं लग्न लावून टाका’ असं म्हटलं. त्यावर सोनिया गांधींनी हसतच, ‘तुम्ही याच्यासाठी मुलगी शोधा’ असं उत्तर दिलं. राहुल गांधीही या उत्तरावर, ‘असं होईल…’ म्हणत प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी या महिलांना चमचाने गोडधोड खाऊ घातल्याचंही काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे.
प्रियंका गांधी काय म्हणाल्या
यावेळेस उपस्थित असलेल्या प्रियंका गांधींनी, ‘राहुल हा सर्वात खोडकर होता. मात्र जास्त ओरडाही तोच खायचा,’ असं सांगितलं. 8 जुलै रोजी राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान अचानक सोनपत येथील मदीना गावात थांबले होते. त्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांची चर्चा केली. तसेच शेतातील काही कामंही केली.
मां, प्रियंका और मेरे लिए एक यादगार दिन, कुछ खास मेहमानों के साथ!
सोनीपत की किसान बहनों का दिल्ली दर्शन, उनके साथ घर पर खाना, और खूब सारी मज़ेदार बातें।
साथ मिले अनमोल तोहफे – देसी घी, मीठी लस्सी, घर का अचार और ढेर सारा प्यार।
पूरा वीडियो यूट्यूब पर: pic.twitter.com/8ptZuUSDBk
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 29, 2023
…म्हणून दिलं आमंत्रण
राहुल गांधींनी पेरणीची कामंही केली. त्यांनी ट्रॅक्टरही चालवला. शेतातील महिलांबरोबर चर्चाही केली. यावेळेस चर्चेदरम्यान या महिलांनी दिल्ली एवढ्या जवळ असूनही आपण कधी दिल्लीला भेट दिली नाही असं राहुल गांधींना सांगितलं. हे ऐकून राहुल गांधींनी त्यावेळेस या महिलांना दिल्लीमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळेस राहुल गांधींनी या महिलांचं त्यांच्या बहिणीशी म्हणजेच प्रियंका गांधींशी बोलणं करुन दिलं होतं. यावेळेस प्रियंका गांधींनीही या महिलांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं.