( प्रगत भारत । pragatbharat.com)
बिहारच्या (Bihar) पाटणा Patna) येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा त्यांचा मृत मुलगा 7 वर्षांनी जिवंत घरी परतला. आई-वडिलांनी तर त्याला मृत समजून अंत्यसंस्कार करुन टाकले होते. पण सात वर्षांनी मुलगा जिवंत असल्याचं पाहून त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आसोपूर येथे वास्तव्यास असणारे बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय 2016 मध्ये घऱातून अचानक बेपत्ता झाला होता. दोघांनी आपल्या मुलाला शोधण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. पण अखेर त्यांच्या आशा संपल्या होत्या. यानंतर त्यांनी काही भोंदूंच्या फंद्यात पडून हिंदू पद्धतीने मुलाचा पुतळा तयार केला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
पण 7 वर्षाने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांचा मुलगा घऱी परतला होता. दिल्लीमधील एका संस्थेचे आणि लखनीबिघा पंचायतीचे प्रमुख शत्रुघ्न यांच्या माध्यमातून बिहारी राय पुन्हा एकदा आपल्या आई-वडिलांकडे परतला. त्याला पाहताच आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि आनंद तर गगनात मावेनासा झाला होता.
बिहारी रायला पाहताच आई-वडिलांनी त्याला मिठी मारत आपला आनंद साजरा केला. वडील बृजनंदन राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा बेपत्ता झाल्यानंतर अनेकदा आपल्याला तो स्वप्नात दिसत होता. एकदा तर मुलानेच स्वप्नात येऊन आपण जिवंत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्यांनी एका भोंदूला सांगितलं असता, त्याने तुझ्या मुलाचा मृत्यू झाला असून त्याची आत्मा तुला त्रास देत आहे असं सांगितलं. आत्म्याला पळवून लावण्यासाठी एका पुतळ्याला आपला मुलगा समजून तुम्हाला अंत्यसंस्कार करावे लागतील असंही त्याने सांगितलं होतं.
बृजनंदन राय यांनी त्याचं म्हणणं ऐकलं होतं, आणि एक पुतळा तयार करत हिंदू परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार केले होते. पण काही दिवसांपूर्वी गावातील प्रमुखाच्या मोबाईलवर दिल्लीमधील एका संस्थेचा फोन आला. त्यांनी बिहारी राय जिवंत आहे सांगत, त्याचा फोटोही पाठवला.
बिहारी रायची ओळख पटल्यानंतर गावप्रमुखाने त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. सुरुवातीला तर कुटुंबाचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण 7 वर्षांनी जेव्हा बिहारी राय घरी आला तेव्हा त्यांच्या घरातील सर्व आनंदही परतला. बिहारी रायची मानसिक स्थिती योग्य नसून तो मानसिक रुग्ण आहे. यामुळे त्यालाही आपण नेमकं घरातून कधी आणि कशाप्रकारे बाहेर पडलो होतो याची माहिती नाही.