साधूने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून केलं ठार, मृत्यू होईपर्यंत त्याने….; हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूच्या वेषातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्याला उचलून जमिनीवर आपटलं. जोपर्यंत मुलाचा मृत्यू होत नाही तोवर आरोपी त्याला उचलून खाली आपटत होता. तिथे उपस्थित लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर धाव घेतली आणि आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली जात आहे. आरोपीला अटक करण्यात आलं असून, त्याची ओळख 52 वर्षीय ओमप्रकाश अशी पटली आहे. तर दुसरीकडे मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपीने मुलावर हल्ला करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धन परिसरात राधा कुंड येथे ही घटना घडली आहे. साधूच्या वेषात आलेल्या एका व्यक्तीने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला पकडलं. यानंतर त्याने त्याचे पाय पकडले आणि खाली जमिनीवर आपटलं. प्रहार इतक्या जोरात झाला की मुलाने जागीच जीव सोडला. दरम्यान, मुलाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी हे कृत्य करत होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

आरोपीचं हे कृत्य तिथे उपस्थित लोकांनी पाहिल्यानंतर त्याच्या दिशेने धाव घेतली. यानंतर जमावाने त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपी जखमी झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती घेतली. 

घराबाहेर खेळत होतं मूल

मथुराच्या गोवर्धन परिसरातील राधाकुंड सार्वजनिक केंद्राजवळ एक 5 वर्षांचा मुलगा आपल्या घराबाहेर खेळत होता. याचवेळी साधूच्या वेषातील एक व्यक्ती तिथे पोहोचतो. तो मुलाला उचलतो आणि दोन्ही पाय पकडून खाली जमिनीवर आपटतो. यामुळे मुलाचा मृत्यू होतो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण आहे. संतापलेल्या लोकांनी मुलाचा मृतदेह ठेवून आंदोलनही केलं. स्थानिक आणि मुलाच्या नातेवाईकांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

पोलिसांनी काय सांगितलं आहे?

पोलीस अधीक्षक त्रिगुण बिसेन यांनी सांगितलं आहे की, 5 वर्षीय मुलाच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सप्तकोशी यात्रा करत होता. मुलाचे वडील यात्रा मार्गावर छोटेसे जनरल स्टोअर चालवतात. “हत्येमागे नेमका काय हेतू होता हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, प्रकृती बरी झाल्यानंतर चौकशी केली जाईल,” असे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) त्रिगुण बिसेन यांनी सांगितले.

Related posts