Parliament Security Breach Lalit Jha Arrested by Delhi Police;संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला. 

ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले. मात्र पोलिसांनी त्याला दिल्लीतून पकडले आहे. बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली असून अवघ्या 34 तासांत त्याला पकडण्यात आले. त्याला दिल्लीतील दत्तपथ पोलीस ठाण्याजवळ पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने शरणागती पत्करली असण्याचीही शक्यता आहे.

आरोपी ललितच्या अटकेसाठी छापेमारी सुरू होती. दिल्ली पोलिसांचे एक पथक राजस्थानमध्ये छापे टाकत होते आणि राजस्थानच्या नागौरजवळ पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी ललितने त्याचा मोबाईल बंद केल्याचे उघड झाले. येथेच ललितचे शेवटचे लोकेशन उघड झाले. तो इंटरनेटही वापरत नव्हता. ललित झाच्या सांगण्यावरून स्मोक कलर अटॅकसाठी 13 डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर ललित झा यांनी सर्व आरोपींना गुरुग्राममध्ये बैठकीसाठी बोलावले होते.ललित झा यांनीच या कलर हल्ल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता.

आतापर्यंत पाच लोकांना अटक

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली आहे. संसदेत घुसखोरी करणाऱ्या दोन आरोपींची नावं सागर शर्मा आणि मनोरंजन अशी आहेत. सागरने मैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर लोकसभेत एन्ट्री केली होती. तर संसदेबाहेर निदर्शनं करणाऱ्या आरोपींची नावं नीलम कौर आणि अमोल शिंदे अशी आहेत. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. घरी भरती होण्यासाठी जात असल्याचं सांगत अमोर दिल्लीला पोहोचला होता. तर पाचव्या आरोपीचं नाव विशाल असं आहे. चारही आरोपी गुरुग्राममध्ये विशालच्या घरी थांबले होते. 

सर्व आरोपी सोशल मीडिया पेजवर भगत सिंह फॅन क्लबशी जोडले गेले आहेत. हे सर्व दीड वर्षांपूर्वी मैसूरमध्ये पहिल्यांदा भेटले. त्यानंतर नऊ महिन्यांनी पुन्हा एकदा भेटले, या भेटीत संसदेत घुसखोरी करण्याचा कट आखल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

8 कर्मचारी निलंबित

दरम्यान, संसद घुसखोरी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.. लोकसभा सचिवालयाने 8 कर्मचाऱ्यांना निलंबीत केलंय. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. 

Related posts