( प्रगत भारत । pragatbharat.com)
Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये.
24 तासांत 5 रूग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मुळे गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन आणि महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 19 मे 2023 रोजी देशात संसर्गाची 865 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
थंडीमुळे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ?
डिसेंबर महिना सुरु असून हवेत गारवा जाणवतोय. अशातच थंडी आणि कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांमुळे अलिकडच्या दिवसांत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीये. यापूर्वी 5 डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. 2020 च्या सुरुवातीपासून जवळपास चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालीये. 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
केंद्रीय मंत्रायलाच्या बेवसाईटनुसार, कोरोनाच्या संसर्गातून बरं झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटी झालीये. यावेळी कोरोनातून बरं होण्याचा दर 98.81 टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.67 कोटी डोस देण्यात आलेत.
बंगालमध्ये 9 महिन्यानंतर कोविडमुळे मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये नऊ महिन्यांनंतर कोरोनाच्या व्हायरसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिलीये. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या संसर्गाव्यतिरिक्त हा रुग्ण इतर अनेक आजारांनी ग्रस्त होता. अधिकाऱ्याने सांगितलं की, त्या व्यक्तीला कोलकाताच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्रात कोरोनाचे 129 रूग्ण
गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 129 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या रूग्णांची एकूण रूग्णसंख्या 479 झाली आहे. याशिवाय मुंबईत कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 129 वर पोहोचली आहे. मुंबईत 25 पैकी 3 रुग्ण हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट J.N.1 चा एकंही रूग्ण आढळलेला नाही.