महिला CEOच्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bengaluru CEO Murders Her Son: आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरु येथे राहणाऱ्या 39 वर्षांच्या महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. एका कंपनीची सीईओ असलेल्या सुचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये तिच्या मुलाचा निर्घृण खून केला आहे. अतिशय थंड डोक्याने तिने संपूर्ण कट रचला होता. मात्र, हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. 

गोव्यात मुलाची हत्या करुन सुचना सेठ रस्तेमार्गे बेंगळुरुला रवाना होत होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत कर्नाटक पोलिसांसोबत संपर्क करत तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील ऐमगंगा पोलीस स्थानकातून ताब्यात घेण्यात आले आहेत. गोवा पोलिसांनी स्वतःच्याच मुलाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कलंगुट पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक परेश नाइक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचना शेठविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुचना सेठ एका कंपनीची संस्थापक आणि सीईओ आहे. सुचना तिच्या चार वर्षांच्या मुलासह शनिवारी कँडोलिम हॉटेल सोल बनयान ग्रँडच्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये खोली क्रमांक 404 मध्ये राहात होती. सोमवारी चेक आऊट केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी सुचना सेठच्या खोलीची साफसफाई करताना त्यांना खोलीत रक्ताचे थेंब आढळले. त्याने लगेचच हॉटेलच्या मॅनेजरला याबाबत माहिती दिली. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्रशासनाने कलंगुट पोलिसांना संपर्क केला. 

पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. सीसीटिव्ही तपासल्यानंतर सुचना सेठ तिच्या मुलाशिवाय एकटीच खोलीच्या बाहेर आली. पोलिसांना हे संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सुचनाला रस्तेमार्गाने बेंगळुरुला जायचे होते. त्यासाठी ती टॅक्सीच्या शोधात होती. कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलेही की टॅक्सीचा खर्च महाग होईल त्यामुळं तिने विमानप्रवास केला पाहिजे. मात्र ती टॅक्सीनेच बेंगळुरुला जाईल असा हट्ट धरला. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिची बेंगळुरुला जायची व्यवस्था केली. त्यांनी स्थानिक व्यक्तीची कॅब बुक केली. 

कलंगुट पीआय नाईक यांनी स्थानिक कॅब ड्रायव्हरचा पत्ता शोधून काढला आणि सूचनासोबत संपर्क केला. जेव्हा त्यांनी तिला तिच्या मुलाबाबत विचारलं तेव्हा तिने मी मुलाला एका मित्राकडे ठेवलं आहे. फतोरदा येथे मित्राच्या घरी मुलाला सोडून आली आहे. जेव्हा पोलिसांनी तिच्याकडे पत्ता मागितला तेव्हा तो पत्ता खोटा असल्याचे लक्षात आले. 

पोलिसांनी लगेचच टॅक्सी ड्रायव्हरला फोन करत त्यांच्याशी कोंकणी भाषेत बोलत त्याला कार जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. मात्र, असे करताना सुचनाला कोणत्याही प्रकारचा संशय येता कामा नाही. ड्रायव्हरने संधी मिळताच कार पोलीस ठाण्यात नेली. गोवा पोलिसांनी आधीच पोलीसांशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी सुचनाच्या सामानाची तपासणी करताच एका बॅगमध्ये तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेने मुलाची हत्या का केली? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. 

Related posts