( प्रगत भारत । pragatbharat.com)
देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं हे ‘आज तक’शी बोलताना सांगितलं आहे.
हत्येनंतर गोव्यातून बंगळुरुला जात असताना पोलिसांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून सूचना सेठला अटक केली. यावेळी बॅगेची तपासणी करण्यात आली असता त्यात मुलाचा मृतदेह होता.
रात्री कॅबसाठी आला होता अर्जंट फोन
चालक डिसूजाने सांगितलं की, 8 आणि 9 जानेवारीच्या रात्री हॉटेलमधून फोन आला होता. अर्जंट एका प्रवाशाला बंगळुरुला जायचं असल्याचं मला सांगण्यात आलं. मला तात्काळ कॅब पाठवण्यास सांगण्यात आलं. रात्री 12.30 ची वेळ ठरवण्यात आली. 550 किमी प्रवास असल्याने 12 तास लागणार होते. त्यामुळे आम्ही दोन चालक पोहोचलो होतो. झोप पूर्ण होणार नाही यामुळे पर्यायी चालक ठेवला होता. रात्री 1 वाजता ती गाडीत बसली. तिने मला बॅग आणण्यास सांगितलं. रिसेप्शनला काळी बॅग ठेवण्यात आली होती.
बॅग उचलली तर ती फार जड होती. मी बॅग इतकी जड का आहे? त्यात दारुच्या बाटल्या आहेत का? अशी विचारणा केली. त्यावर तिने हो असं उत्तर दिलं. मला त्यावेळी काही शंका आली नाही. त्यात 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह असेल असं मला वाटलं नव्हतं. नंतर आम्ही बंगळुरुच्या दिशेने रवाना झालो.
पुढे त्याने सांगितलं की, संपूर्ण प्रवासात ती फार शांत होती. गाडी सुरु केल्यानंतर आम्ही गोवा-कर्नाटक सीमेवर पोहोचलो असता तिथे वाहतूक कोंडी झाली होती. आम्ही पोलिसांनी किती वेळ लागेल असं विचारलं असता त्यांनी वाहतूक कोंडी मिटायला 4 तास लागतील असं सांगितलं.
मी गाडीजवळ आल्यानंतर तिला 2 तास वाढवून सांगितलं. मी तिला 5 ते 6 तास वाहतूक कोंडी राहणार असून, हवं तर तुम्हाला विमातळावर सोडतो असं सांगितलं. त्यावर तिने नकार देत जेव्हा वाहतूक कोंडी मिटेल तेव्हा जाऊ असं उत्तर दिलं. त्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण एकीकडे बंगळुरुला जाण्याची घाई होती आणि दुसरीकडे वाहतूक कोंडीची काहीच अडचण नव्हती असं त्याने सांगितलं.
गोवा पोलिसांचा फोन
कर्नाटक सीमा पार केल्यानंतर गोवा पोलिसांचा फोन आला. त्यांनी तुम्ही नेत असलेल्या महिला प्रवाशासोबत लहान मुलगा आहे का? अशी विचारणा केली. त्यावर मी नाही असं उत्तर देत काय झालं अशी विचारणा केली. त्यावर पोलिसांनी त्यांच्या रुममध्ये रक्ताचे डाग मिळाले असून मुलगा बेपत्ता झाल्याची शंका असल्याचं सांगितलं.
मी पोलिसांनी तिच्याशी बोलायला दिलं. पोलिसांनी मला 15 मिनिटांनी पुन्हा फोन करतो असं सांगितलं. यानंतर त्यांनी फोन करुन तिने दिलेला पत्ता खोटा असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी रस्त्यात जे पोलीस स्टेशन दिसेल तिथे थांबा आणि आम्हाला फोन करा असं सांगितलं. मी गुगल मॅपवर पाहिलं तर पोलीस स्टेशन मागच्या बाजूला होता. मी यु-टर्न घेतला असता तर सगळं उघड झालं असतं. यानंतर मी पुढे रस्त्यात कोणते पोलीस स्टेशन आहे का हे पाहिलं.
कर्नाटकात सर्व बोर्ड त्यांच्या भाषेत असल्याने समजत नव्हतं. नंतर माझ्यासोबत असणाऱ्या चालकाने म्हटलं की, मी रेस्तराँला थांबवतो. तू वॉशरुमला जा आणि तिथेच थांब. मी जीपीएसवर पोलीस स्टेशन पाहिलं तर नाही दिसलं. नंतर मी तिथल्या एका सुरक्षारक्षकाला विचारलं असता 500 मीटरवर मंगला पोलीस स्टेशन असल्याचं त्याने सांगितलं अशी माहिती चालकाने दिली आहे.
मी पोलीस स्टेशन येण्याआधी पोलिसांना फोन केला होता. मी पोलीस स्टेशनला पोहोचताच मॅडम इथे का आलो आहोत अशी विचारणा करु लागली. त्यावर मी पोलीस फार फोन करत होते, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं.
मी गाडीतून उतरल्यानंतर कर्नाटक पोलिसांना फोन दिला. पोलिसांनी गोवा पोलिसांशी बातचीत केली. गाडीची तपासणी घेतली, मॅडमची चौकशी केली. बॅग उघडण्यात आली असता कपड्यांच्या खाली मुलाचा मृतदेह होता. त्यावेळी ती फार शांत होती. अजिबात घाबरलेली दिसत नव्हती. तिने 12 तास मृतदेहासोबत प्रवास केला. पण पूर्ण रस्ताभर ती शांत होती. ना कोणाचा फोन आला, ना कोणाशी बोलली. फक्त एकदा हॉटेलमधून आला होता असं त्याने सांगितलं.