‘आम’ नाही खास बातमी! ममता बॅनर्जींनी मोदींना पाठवल्या आंब्याच्या पेट्या; ‘हे’ 2 VVIP ही ठरले लाभार्थी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mamata Banerjee Sends Mangoes to PM Modi: भारतामध्ये क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या तिन्ही गोष्टींबद्दल सर्वसामान्यांना प्रचंड रस असतो असं म्हटलं जातं. याच 3 क्षेत्रांमध्ये एकमेकांशी वैर सांगणारे मात्र त्याचवेळी कधीतरी एकमेकांबद्दल अगदी हटके गोष्टी करणारी अनेक व्यक्तीमत्व आहेत. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आपल्या राज्यातील काही खास प्रजातीचे आंबे पाठवले आहेत. मागील 12 वर्षांपासून ममता बॅनर्जी पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यातील सर्वोत्तम प्रजातीचे आंबे पाठवत आहेत. ममता बॅनर्जींच्या निकटवर्तीयांनी सांगितलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी हे आंबे पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यात आले आहेत.

कोणते आंबे पाठवलेत ममतांनी?

हिमसागर, फाजली, लंगडा आणि लक्ष्मण भोग या प्रजातींचे प्रत्येकी 4 किलो आंबे ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना पाठवले आहेत. हे आंबे पंतप्रधान निवास 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठवण्यात आल्याचं ‘इंडिया टुडे’ला सुत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या आंब्याच्या पेट्या आज किंवा उद्यापर्यंत दिल्लीमध्ये पोहचतील. ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदींमधील राजकीय संबंध फारसे चांगले नाहीत. दोन्ही नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. 

यांनाही पाठवले आंबे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींबरोबर राष्ट्रपती दौप्रती मुर्मू आणि भारताचे मुख्य न्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या सरकारी निवासस्थानीही पश्चिम बंगालमधील हे विशेष आंबे पाठवण्यात आले आहेत. मागील वर्षी ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंबे पाठवले होते.

मोदींना दरवर्षी पाठवतात कुर्ता

मोदी आणि ममता बॅनर्जींमध्ये राजकीय मतभेद असले तरी ते खासगी आयुष्यात एकमेकांना अनेकदा भेटवस्तू पाठवत असतात. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दुर्गा पूजाच्यानिमित्ताने दरवर्षी तृणमूलच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी आपल्याला कुर्ता-पायजमा आणि मिठाई पाठवतात असं सांगितलं होतं. “विरोधी पक्षामध्ये माझे अनेक मित्र आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ममता दीदी आजही दरवर्षी मला त्यांनी स्वत: निवडलेला कुर्ता पाठवतात,” असं मोदी एका मुलाखतीत म्हणाले होते. 

टीका आणि काही दिवसांमध्ये आंबे

नुकत्याच ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतरही ममता बॅनर्जींनी केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकावर निशाणा साधला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्येच ममता यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्य न्यायाधिशांना पश्चिम बंगालमधील काही निवडक प्रजातीचे आंबे पाठवले आहेत. आता ममतांच्या या मँगो डिप्लोमसीला मोदी कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related posts