’12th Fail’ चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. 

अग्नी चोप्रा रणजी ट्रॉफीत मिझोरम संघाकडून खेळत आहे. पदार्पणातच त्याने शतकी खेळी करत 166 धावा कुटल्या. सिक्कीमने मिझोरमसमोर 442 धावांचा डोंगर उभा केला असताना, त्यांना प्रत्युत्तर देताना अग्नी चोप्राने ही जबरदस्त खेळी केली. पण मिझोरमचा संपूर्ण संघ 214 धावांवर बाद झाला आणि फॉलो ऑनची नामुष्की ओढावली. 

यानंतर 25 वर्षीय अग्नीने पुन्हा एकदा संघासाठी दमदार खेळी करत 92 धावा ठोकल्या. त्याने संघाला 397 धावांचा टप्पा पार करण्यात मदत केली आणि सिक्कीमसमोर 170 धावांचं आव्हान उभं केलं. आपल्या या खेळीदरम्यान अग्नी चोप्राने 30 चौकार आणि 8 षटकार लगावले. पण अग्नी चोप्राच्या दमदार खेळीनंतरही मिझोर संघाने हा सामना गमावला.

दरम्यान नागालँडविरोधातील सामन्यात अग्नीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. अग्नीने 150 चेंडूत 164 धावा करत मिझोरमला मोठी आघाडी मिळवून दिली. यादरम्यान त्याने 21 चौकार आणि 3 षटकार लगावले. आपल्या दमदार खेळीसह त्याने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अग्नी चोप्रा चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक-लेखिका अनुपमा चोप्रा यांचा मुलगा आहे. अमेरिकेत 4 नोव्हेंबर 1998 रोजी त्याचा जन्म झाला. अग्नीने मुंबई संघातून कनिष्ठ श्रेणीतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कूच-बिहार ट्रॉफी सामन्यांमध्ये तो होता. पण मुंबई संघात संधी मिळण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याने चांगली संधी मिळण्याच्या हेतूने मिझोरम गाठलं. 

मिझोरमने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात छत्तीसगड विरुद्ध त्याला संधी दिली होती. जिथे तो फक्त 5 धावा करु शकला. आतापर्यंत, त्याने सात अ क्षेणी आणि टी-20 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 174 आणि 234 धावा केल्या आहेत.

Related posts