( प्रगत भारत । pragatbharat.com)
उत्तर प्रदेश एका विवाहित महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पोलिसांनी एका निर्माणधीन इमारतीत महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पाण्याच्या टाकीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला असून, आरोपींचं नाव समजल्यानतर फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण परिसर हादरला आहे. याचं कारण महिलेच्या चार दिरांनीच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. यानंतर तिची हत्या केली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या पतीच्या सांगण्यावरुनच हा सगळा कट रचण्यात आला होता.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे महिलेचे दीर आहेत. पीडित महिलेच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असणारा पती सध्या दुबईत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
20 जानेवारीला ही घटना उघडकीस आली होती. स्थानिकांनी एका निर्माणधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत महिलेचा नग्न मृतदेह सापडल्याचं पोलिसांना कळवलं होतं. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या आणि काही पदार्थ सापडले होते. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत चार आरोपींना अटक केली. त्यांची ओळख रोहित लोधी, रामचंद्र उर्फ पुट्टू, शिवम उर्फ पंचम आणि सोनू लोधी अशी पटली आहे. पाचवा आरोपी नंकू लोधी सध्या फरार आहे.
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी महिला माहेरी गेल्यानंतर जत्रेत जाण्याच्या बहाण्याने बाहेर नेत बलात्कार केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी विटांनी तिचा चेहरा विद्रूप केला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व कट आरोपींचा भाऊ जो महिलेचा पतीही आहे त्याने रचला होता. त्याने आरोपींना रोख रक्कम देण्याचं आमिष दाखवलं होतं. दरम्यान पोलीस सध्या मुख्य आरोपी आणि फरार असणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच डोक्यावर झालेली गंभीर जखम आणि रक्तस्त्राव यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.