( प्रगत भारत । pragatbharat.com)
Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे.
Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून रोकडच नव्हेस तर, सोनं, मोबाईल, लॅपटॉप आणि अशा अनेक महागड्या गोष्टीसुद्धा जप्त करण्यात आल्या असून आता पुढील चौकशी सुरु आहे. घरामध्ये इतकी रक्कम आली कुठून या प्राथमिक प्रश्नाचं उत्तर देण्यात अधिकारी असमर्थ ठरल्यामुळं त्यांच्या सर्व संपत्ती आणि ऐवजावर यंत्रणांनी जप्तीची कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तेलंगणातील एस. बालकृष्ण या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यालयात बुधवराली धाडी टाकल्या. यावेळी धाडीमध्ये समोर आलेली रोकड मोजताना यंत्रही थकली, पण रक्कम काही संपली नाही हेच धक्कादायक वास्तव समोर आलं. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.
कोणत्या विभागात काम करतात हे अधिकारी?
एस. बालकृष्ण तेलंगणातील रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चा सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी पदावर काम करत असून, याआधी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेवलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये टाऊन प्लॅनिंग विभागात संचालकपदी सेवेत होते.
उपलब्ध माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला बालकृष्ण यांच्यासंदर्भातील अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. ज्यानंतर ACB च्या 14 पथकांनी त्यांच्या अनेक तळांवर धाडी टाकल्या. अद्यापही ही कारवाई पूर्ण झाली नसून, यंत्रणेकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरु आहे.
धाडसत्रामध्ये कोणत्या गोष्टी समोर आल्या?
एस. बालकृष्ण यांच्या घर, कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरांमध्ये धाड टाकल्यानंतर 100 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला. यामध्ये 40 लाख रुपयांची रोकड, 2 किलो सोनं, स्थावर आणि जंगम संपत्ती, 60 महागडी घड्याळं, 14 मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले. अद्यापही त्यांचे बँक लॉकर उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळं इथून किती ऐवज सापडतो यावर आता अनेकांचं लक्ष आहे.