‘मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,’ विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आपण वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेक चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाप्रकारे ते फक्त आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान आपण नियमांचं उल्लंघन केलेलं असतानाही हे चालक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालत असतात. अशावेळी अनेकदा त्यांच्याकडून पोलिसांना अपशब्द वापरत, मारहाणही केली जाते. पण असं करत आपण कायद्याच्या कचाट्यात अडकून आपल्या नावे गुन्हा दाखल होऊ शकतो याची अनेकांना कल्पना नसते. दरम्यान बंगळुरुत असाच एक प्रकार घडला असून, दुचाकी चालकाने विनाहेल्मेट पकडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा चावा घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सय्यद सफी असं या तरुणाचं नाव आहे. सय्यद सफी विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखलं. विल्सन गार्डन 10th ग्रॉस येथे पोलिसांनी त्याला अडवलं होतं. यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. यादम्यान हेड कॉन्स्टेबल सिद्धरामेश्वर संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. 

व्हिडीओत 28 वर्षीय सय्यद सफी पोलीस कर्चमाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसत आहे. यावेळी एका क्षणी तर सय्यदने आपली चावी परत मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा चावा घेतला. 

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, तरुण पोलिसांनी सांगत आहे की, आपण रुग्णालयात जात असल्याने घाई गडबडीत हेल्मेट घालायला विसरलो. माझा हा व्हिडीओ व्हायरल झाला तरी मला काही फरक पडत नाही. यानंतर सय्यद सफीने हेड कॉन्स्टेबलचा फोन खेचून घेतला. माझा व्हिडीओ का रेकॉर्ड केला जात आहे अशी विचारणा यावेळी त्याने केली. यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तात्काळ त्याला पकडलं आणि बेड्या ठोकल्या. 

रस्त्यावर सुरु असलेला हा गोंधळ पाहून बघ्यांची एकच गर्दी झाली होती. यादरम्यान काही लोकांनीही तरुणाला पोलिसांशी गैरवर्तन करत असल्याने जाब विचारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संशयित तरुणाने वाहतूक पोलिसांशी गैरवर्तन केलं आहे. त्याने कर्मचाऱ्याचं बोट चाऊन जखमी केलं आहे”. 

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणे आणि शारीरिक दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

Related posts