वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vande Bharat Express: देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसचीच (Vande Bharat Train) जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने ज्या पद्धतीने ही एक्स्प्रेस रुळावर आणली त्यावरून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती झाल्याचे म्हटलं जात होते. मात्र वेग सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ही एक्स्प्रेस ट्रेन इतर ट्रेन्ससारखीच निघाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनचे छत गळत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ही ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चपातीमध्ये (Chapati) झुरळ (cockroach) सापडले आहे. या प्रवाशाने ट्वीट करुन याबाबत आपली तक्रार मांडल्यानंतर रेल्वेनेही (Indian Railway) याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

वंदे भारत ट्रेनमध्येदिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात झुरळे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ट्रेनमधील जेवण आयआरसीटीसीच्या केटरिंगने पुरवले होते. प्रवाशाने ट्विटरवर रेल्वे विभागाला टॅग करून याबाबत माहिती दिली. प्रवाशाने ट्विटमध्ये पराठ्याचे फोटोही शेअर केले होते. या घटनेनंतर इतर अनेक प्रवाशांनीही व्हिडीओ शेअर करत अन्न खाल्ल्यानंतर घशात समस्या जाणवल्याच्या तक्रारी केल्याचे समोर आले आहे. यावर आयआरसीटीसीने ट्विटवर उत्तर देत जेवण पुरवणाऱ्याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

सुबोध नावाच्या प्रवाशाने सांगितले की, तो 24 जुलै रोजी राणी कमलापती स्थानकावरून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 20171) मध्ये बसला होता. तो भोपाळहून ग्वाल्हेरला जात होता. ट्रेनमधील त्याच्या सी-8 कोचमध्ये सीट क्रमांक-57 आरक्षित होता. प्रवाशाने जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र त्यामध्ये दिलेल्या चपातीमध्ये झुरळं सापडली. यासंदर्भात प्रवाशाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वेकडे ट्विट करून तक्रार केली आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आयआरसीटीसीने कारवाई करत सेवा पुरवठादाराला दंड ठोठावला आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही सुद्धा दिली आहे.

सुबोधच्या ट्विटच्या खाली विक्रम श्रीवास्तव नावाच्या प्रवाशानेही व्हिडिओ शेअर केला आहे. तेही त्याच ट्रेन आणि डब्यातून प्रवास करत होते. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती, “माझे नाव जितेंद्र शर्मा आहे. ट्रेनचे जेवण खाल्ल्यानंतर मला घशामध्ये त्रास होतो. अन्नातून विषबाधा झाल्यासारखे वाटत आहे,” असे म्हणताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आणखी दोन प्रवासीही होते. त्यातील एकाने सांगितले की, जेवल्यानंतर त्याला उलट्या झाल्या. तर दुसऱ्या प्रवाशाने जेवण परत पाठवून सूप मागवले.

IRCTC ने दिलं उत्तर

“सर, या वाईट अनुभवाबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित सेवा पुरवठादाराला स्वयंपाक करताना काळजी घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच, जेवण पुरवणाऱ्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. स्वयंपाकघरात अधिक स्वच्छता ठेवण्यास सांगण्यात आले आहे,” असे आयआरसीटीसीनं म्हटलं आहे.

या सगळ्या प्रकारानंतर रेल्वेने निवेदनही जारी केले आहे. भोपाळचे पीआरओ सुभेदार सिंह यांनी सांगितले की, “प्रवाशाच्या पराठ्यात झुरळ असल्याची माहिती समोर आली. ट्रेनमधील आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याने तात्काळ प्रवाशाशी संपर्क साधून कारवाई केली आहे. त्यानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.”

Related posts