शहीद जवानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळा गाव एकवटला, 24 तासात बांधला 500 मीटर रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे शहीद जवानाप्रती आपला सन्मान व्यक्त करताना ग्रामस्थांनी एक असं उदाहरण उभं केलं आहे, ज्याची सगळ्याकडे चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी स्मशानापर्यंत रस्ता बांधला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्रामस्थांनी फक्त 24 तासांत गावकऱ्यांनी रस्ता उभा केला. या रस्त्याला शहीद जवानाचं नाव देण्यात आलं आहे. शहीद जवानाची गावापासून ते स्मशानापर्यंत रस्ता बांधला जावा, जेणेकरुन अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होणार नाही अशी इच्छा होती. 

लडाखमध्ये जवान शहीद

तीन दिवसांपूर्वी लडाखमध्ये एका वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात 9 जवान शहीद झाले होते. या शहिदांमध्ये शिमला ग्रामीणचे विजय कुमारही होते. हवालदार पदावर असणारे विजय कुमार फार साध्या कुटुंबातून होते. 17 वर्षांपासून ते लष्करात कर्तव्य बजावत देशसेवा करत होते. विजय कुमार शहीद झाल्याचं समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. विजय कुमार यांच्यानंतर त्यांच्या मागे 75 वर्षीय वडील बाबूराम, 65 वर्षी. आई कौशल्या, पत्नी निलम आणि दोन मुलं आहेत. 

‘शहीद विजय कुमार मार्ग’

शिमला ग्रामीणच्या डिमन गावात राहणारे हवालदार विजय कुमार यांचा सन्मान करताना गावकऱ्यांनी आदर्श उभा केला आहे. ग्रामस्थांनी विजय कुममार यांच्या अत्ययात्रेसाठी 500 मीटरचा रस्ता बांधला. यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. काही तासात गावकऱ्यांनी रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलं. या रस्त्याला शहीद विजय कुमार यांचं नाव देण्यात आलं आहे. 

शहीद विजय कुमार यांच्या भावाने सांगितलं की, रविवारी सकाळी नातेवाईकांना विजय कुमार शहीद झाल्याची माहिती मिळाली. यानंतर ग्रामस्थांनी एकत्र आले आणि विजय कुमार यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी रस्ता बांधण्याचं ठरवल्यानंतर आनंदाने आपली जमीनही दिली. विशेष म्हणजे, लेह-लडाख येथून शहीद विजय कुमार यांचं पार्थिव गावी पोहोचण्याआधी गावकऱ्यांनी दिवसरात्र जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार केला होता. 

राजकुमार यांनी सांगितलं की, अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होऊ नये यासाठी गावापासून ते स्मशानभूमीपर्यंत चांगला रस्ता असावा अशी विजय कुमार यांची इच्छा होती. तिथे फक्त कच्चा रस्ता असल्याने ते ही इच्छा व्यक्त करत आहेत. 

विजय कुमार जिवंत असेपर्यंत ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण शहीद झाल्यानंतर 24 तासातच त्यांची इच्छा पूर्ण झाली. याच रस्त्याने त्यांची अंत्ययात्रा पार पडली. अत्यंयात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Related posts