( प्रगत भारत । pragatbharat.com)
ऑनलाइन फसवणूक किंवा हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं समोर येत असतात. गुन्हेगार अनेकदा सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपये लंपास करत असतात. या जाळ्यात अडकू नका असं आवाहन वारंवार पोलीस करत असतात. पण पोलीस अधिकारीच जेव्हा अशा जाळ्यात अडकतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या तिहार जेलमधील जेलरलाच 50 लाखांचा चुना लावण्यात आला आहे.
तिहार कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक दीपक शर्मा यांना फक्त पोलीस अधिकारी नाही तर बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसमुळे ओळखलं जातं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण नुकतंच त्यांनी आपली 50 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. आरोग्य उत्पादनाच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एक महिला आणि तिच्या पतीने आपली 50 लाखांची फसवणूक झाल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.
व्यावसायिक कुस्तीपटू रौनक गुलिया आणि तिचा पती अंकित गुलिया यांनी आपली फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तक्रारीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्कव्हरी चॅनेलवर आलेल्या ‘India’s Ultimate Warrior’ या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांची एका महिलेशी भेट झाली होती. ही महिला रौनक गुलिया होती.
आपल्या तक्रारीत दीपक शर्मा यांनी आरोप केला आहे की, राष्ट्रीय आणि राज्य कुस्ती चॅम्पियन असलेल्या रौनक गुलियाने त्यांना आपली पती अंकित गुलिया हेल्थ प्रोडक्टमधील उद्योजक असल्याचं सांगितंल होतं. आपण गुंतवणूकदार शोधत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यानंतर त्यांनी आपल्या हेल्थ सप्लिमेंट प्रोडक्टमध्ये फार मोठा नफा आहे सांगत गुंतवणूक करण्यास तयार केलं. तसंच ब्रँड अॅम्बेसिडर करु अशी बतावणी करत 50 लाख रुपये घेतले. पण नंतर त्यांनी हे पैसे परत करण्यास नकार दिला.
सत्य समोर आल्यानंतर दीपक शर्मा यांनी पूर्व दिल्लीमधील मधु विहार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून, दोघांचा शोध घेत आहेत. जेलर दीपक शर्मा विनोद नगरमध्ये राहतात.
कोण आहे आरोपी महिला?
सोशल मीडियावर दीपक शर्मा आणि गुलिया यांचे चांगलेच फॉलोअर्स आहेत. रौनक गुलियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती एक खेळाडू असल्याचं दिसत आहे. तिने आपल्या प्रोफाइलमध्ये स्वत:ला कुस्तीपटू म्हटलं असून, भारत केसरी असा उल्लेख केला आहे. तसंच नॅशनल मेडलिस्ट असंही म्हटलं आहे.
रौनक गुलियाने आपल्या प्रोफाइलमध्ये रिअॅलिटी शो अल्टिमेट वॉरियरचा उल्लेख केला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे जे फोटो उपलब्ध आहेत, त्यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे.