Mahadev Book app Saurabh Chandrakar ED Action Property worth Rs 417 crore seized;लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक  घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे.  ‘महादेव बुक’ अ‍ॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे.  या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या ‘रॉयल ​​वेडिंग’वर किमान 200 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

सौरभ चंद्राकरने आपल्या लग्नाच्या वेडिंग प्लॅनरच्या नियुक्तीसाठी 120 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी ४२ कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते. त्याचा हा व्यवहार त्याला ईडीच्या रडारखाली घेऊन आला आहे. सौरभ चंद्राकरच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली होती. त्याने पाहुण्यांसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. त्यामुळे या लग्नावर किमान 200 कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे.

सौरभ चंद्राकर कोण आहे?

मूळचा छत्तीसगडचा असलेला सौरभ चंद्राकर हा दुबईत राहतो. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईच्या आरएके शहरात सौरभ चंद्राकरचे लग्न झाले. सौरभ चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल हा महादेव अॅप चालवतो. याद्वारे बेटिंग केले जात असल्याचा आरोप आहे. चंद्रकरने लग्नात खर्च केलेले सर्व पैसे हवालाद्वारे रोख स्वरूपात दिल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. यामुळेच आता सौरभविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

योगेश पोपटच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आर-1 इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला हवालाच्या माध्यमातून 112 कोटी रुपये देण्यात आल्याचे डिजिटल पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यापैकी 42 कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. या अॅपच्या व्यवसायासंदर्भात ईडीने रायपूर, भोपाळ, मुंबई आणि कोलकाता यासह एकूण 39 ठिकाणी छापे टाकले. 

याच प्रकरणात ईडीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा आणि इतरांच्या घरावरही छापा टाकला होता. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 15 जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

सौरभ चंद्राकरच्या या लग्नासाठी त्याने भारतातून आपल्या पाहुण्यांना दुबईत बोलावले होते. त्यांच्यासाठी चार्टर्ड विमाने बुक केली होती. सनी लिओनी, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, भारती सिंग, कृष्णा अभिषेक, भाग्यश्री, नुसरत भरुचा यांसारख्या स्टार्सनाही स्टेज परफॉर्मन्ससाठी बोलावण्यात आले होते. या सर्वांना मोठ्या प्रमाणात पैसेही देण्यात आले होते.

Related posts