मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त…; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांना नुकतंच संचालक मंडळात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांच्या नियुक्तीसाठी कंपनीने भागधारकांची मंजुरी मागितली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाचे हे तिन्ही उत्तराधिकारी कोणताही पगार घेणार नाहीत. त्यांना फक्त बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठीचं मानधन दिलं जाईल. भागधारकांसमोर नियुक्तीसाठी ठेवलेल्या प्रस्तावात ही माहिती देण्यात आली आहे.

भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. पण त्यांचे चुलत भाऊ निखिल आणि हितल यांच्यासह इतर कार्यकारी संचालकांना पगार, अनुमती, भत्ते आणि कमिशन दिले जाते.

नुकतंच मुकेश अंबानी तिन्ही मुलं आकाश, अनंत आणि ईशाला संचालक मंडळात सहभागी करुन घेण्याची घोषणा करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला होता. 

रिलायन्सने भागधारकांना पत्र पाठवून अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या नियुक्तीसाठी मंजुरी मागितली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, नवीन संचालकांना संचालक मंडळाच्या किंवा समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी शुल्क दिले आणि कंपनीच्या नफ्यातील कमिशन दिलं जाईल. संचालक या नात्याने ते कंपनीकडून कोणताही पगार घेणार नाहीत. 

ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेल सांभाळत आहे. दरम्यान, आकाश अंबानी टेलिकॉम व्यवसाय जिओचे प्रमुख आहेत. तर त्यांचे बंधू अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्सचा ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा व्यवसाय आहे.

निता अंबानी यांची 2014 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळात नियुक्ती झाल्यानंतरही याच अटी ठेवण्यात आल्या होत्या. कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, 2022-23 आर्थिक वर्षात निता अंबानी यांना 6 लाखांची फी आणि 2 कोटी कमिशन मिळालं. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत तिन्ही मुलांना संचालक मंडळात समाविष्ट करण्याची घोषणा करताना, निता अंबानी पायऊतार होत असल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. 

मुकेश अंबानी यांनी आपले उत्तराधिकारी असणाऱ्या तिन्ही मुलांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली आहे. मात्र ते पुढील पाच वर्षं कंपनीच्या चेअरमनपदी कायम राहणार आहेत. जेणेकरुन पुढील पिढीला नेतृत्वासाठी तयार कऱण्यात हातभार लावता येईल. अंबानी यांनी सर्वात प्रथम 2022 मध्ये उत्तराधिकार योजनेबद्दल सांगितलं होतं.  जिथे त्यांनी जाहीर केलं होतं की, त्यांची तीन मुलं कंपनीच्या विविध विभागांचे प्रमुख असतील.

 

Related posts