Vat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी ‘या’ मुहूर्तांवर करा वडाची पूजा, साहित्यापासून विधीवत पूजेपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vat Purnima 2023 Date : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही महिलांसाठी खूप खास असते. इथे नवविवाहितेपासून ते प्रत्येक सौभाग्यवती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतं. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतात वट सावित्रीचं व्रत केलं जातं. यंदाची वटसावित्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. सा हा वटपौर्णिमेचा दिवस कधी आहे, शुभ मुहूर्त काय आज आपण जाणून घेऊयात. लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती करुन घ्या. 

वट सावित्री पौर्णिमा 2023 कधी आहे?

पंचांगानुसार येत्या शनिवारी म्हणजे 3 जून 2023 वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतं आहे. यादिवशी विवाहित महिला वटवृक्ष, सावित्री आणि सत्यवान यांची पूजा करतात. 

वट सावित्री पौर्णिमा 2023 तिथी 

पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 3 जून 2023 सकाळी  11.16 वाजता सुरु होणार आहे. तर दुसऱ्यादिवशी 4 जून 2023 रविवारी सकाळी 09.11 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण शनिवारी साजरा करायचा आहे. 

वट सावित्री पौर्णिमेला 3 शुभ योग

ही वट पौर्णिमा अतिशय खास आहे. यादिवशी  3 शुभ योग जुळून आले आहेत. शिवयोग, सिद्धी योग आणि रवि योग असणार आहे. शनिवारी सकाळपासून शिवयोग सुरु होणार असून दुपारी 02:48 पर्यंत असणार आहे. त्यानंतर सिद्धी योग दुपारी 02:48 पासून संपूर्ण रात्री असणार आहे. तर रवियोग पहाटे 05:23 ते 06:16 पर्यंत असणार आहे. 

नक्षत्राबद्दल बोलायचं झालं तर वट पौर्णिमेला विशाखा नक्षत्र सकाळी 06:16 पर्यंत असणार आहे. त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरु होणार असून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 05:03 पर्यंत असेल. 

वट सावित्री पौर्णिमा 2023 पूजा मुहूर्त

पूजेसाठी शुभ काळ – सकाळी 07:07 ते 08:51 पर्यंत 
दुपारी पूजेचा शुभ मुहूर्त – 12:19 ते 05:31 पर्यंत 
लाभ-प्रगतीचा मुहूर्त – 02:03 ते 03:47 पर्यंत 
अमृत-सर्वोत्तम मुहूर्त – दुपारी 03:47 ते 05:31 पर्यंत

वट सावित्रीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य

हळद
कुंकू
गुलाल
रांगोळी
तांब्या
ताम्हण
पळी
भांडं
पाट
गंध-अक्षता
बुक्का
फुलं
तुळस
दूर्वा
उदबत्ती
कापूर
निरांजन
विड्याची 12 पानं
कापसाची वस्त्रे
जानवं
12 सुपाऱ्या
फळं
2 नारळ
गुळ-खोबरं
बांगड्या
फणी
गळेसरी
पंचामृत
5 खारका
5 बदाम
सूताची गुंडी

वट पौर्णिमेची विधीवत पूजा कशी करावी?

अनेकांना वाटतं वडाच्या झाडाची पूजा करावी आणि त्याला प्रदक्षिणा मारत दोर गुंडाळायचं. पण आज आपण वट पौर्णिमेची विधीवत पूजा जाणून घेणार आहोत. वडाच्या झाडाला किंवा बाजारात मिळणाऱ्या वटपौर्णिमेच्या प्रतिमेची पूजा करा. ब्रह्म सावित्री देवतेचं चिंतन करुन 16 उपचारांनी पूजा करा. सुपारीच्या गणपीती स्थापना करा. हळद कुंकू अक्षता वाहून पंचामृत स्नान विधी करा. सौभाग्य अलंकार देवीला म्हणजे वडाला अर्पण करा. हा विधी केल्याने पतीचं आयुष्य वाढतं. त्यानंतर वट वृक्षाला तीन प्रदक्षिणा करत दोर गुंडाळावा. फळं, नारळ अपर्ण करा. मुंबई आणि कोकण परिसरात फणस, आंबा, जांभूळ, कंरवंद आणि केळी या फळांना महत्त्व आहे. पण तुमच्या परिसरात जी पाच फळं मिळतात ती अपर्ण करावीत. त्यानंतर पाच सुवासिनींची पाच फळं आणि गव्हाने ओटी भरावी. मुंबई आणि कोकण परिसरात पाच किंवा सात काळे मणी एका धाग्यात ओवून मंगळसूत्राला बांधण्याची परंपरा आहे. यादिवशी उपवासालाही महत्त्व आहे. हा उपवास दुसऱ्या दिवशी 10 नंतर सोडावा.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts