( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) एका बॅंक मॅनेजरच्या हत्या प्रकरणात (sachin upadhyay murder case) रोज नवेनवे खुलासे होत आहेत. पत्नीनेच बॅंक मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बॅंक मॅनेजरची पत्नी व सासरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस तपासात बॅंक मॅनेजरचा मृतदेह खोलीत आढळून आला होता. दरम्यान, घरातल्या कामावालीने पोलिसांना (UP Police) दिलेल्या माहितीनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
शम्साबाद रोड इथं राहणाऱ्या 38 वर्षीय सचिन उपाध्याय यांचा 12 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला सचिन उपाध्याय यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर उपाध्याय यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी सचिन उपाध्याय यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजपासून ते कॉल डिटेल्सपर्यंतची माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पत्नी प्रियांका रावत, सासरा ब्रिजेंद्र रावत, त्यांचा मुलगा कृष्णा रावत यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.
मात्र आता याप्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियांकाने पती सचिनची हत्या केल्याचे समोर आले आहे. सचिनच्या हत्येनंतर जेव्हा प्रियांकाची मोलकरीण घरी आली तेव्हा तिने तिला कढीभात आणि 16 चपात्या बनवण्यास सांगितले होता. घरात काही अनुचित प्रकार घडल्याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रियांकाने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. प्रियांकाने सचिनचा मृतदेह खोलीतच लपवून ठेवला होता. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच प्रियांका अतिशय हुशारीने सर्वांना वेड्यात काढत होती. इतकंच नाही तर प्रियांकाने शेजाऱ्याकडे एकाच दिवशी दोनदा मोबाईल घेऊन वडिलांशी संवाद साधला होता.
प्राथमिक तपासात सचिनच्या शरीरावर, मानेवर जखमा आणि भाजण्याच्या खुणा होत्या. शवविच्छेदन अहवालात ही हत्याच असल्याचे समोर आले होते. अहवालानुसार, सचिन उपाध्याय यांची 11 ऑक्टोबरच्या रात्री हत्या करण्यात आली होती आणि 12 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली. प्रियांकाने मृतदेह तब्बल 17 तास लपवून ठेवला होता. परिसरात सीसीटीव्ही लावले नसते तर सचिनचा मृतदेहही बेपत्ता झाला असता, असा आरोप सचिनच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रियांकाला तिथे सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती असल्याने तिने मृतदेह घराबाहेर काढला नाही.
दरम्यान, अनेक तासांच्या नियोजनानंतर प्रियांकाने सचिनच्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सचिनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर ज्या खोलीत मृतदेह लपवला होता, त्या खोलीला प्रियांकाने कुलूप लावले होते. या सगळ्या प्रकारानंतर त्या ठिकाणी पोहोचणारा पहिला व्यक्ती प्रियांकाचा भाऊ होता.