Diwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Diwali Paid Leave: सणवारांच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच कामातून काही वेळ काढत आपल्या माणसांना, कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देण्याची नितांत गरज असते. किंबहुना अनेजण या दिवसांमध्ये कुटुंबालाच केंद्रस्थानी ठेवतात. सध्याही असाच एकंदर माहोल पाहायला मिळत आहे, जिथं प्रत्येकजण दिवाळीची आणि त्याहूनही या सणाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सुट्ट्यांची वाट पाहत आहे. 

अशा या दिवाशीच्या सणानिमित्त अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट्या, बोनस, विविध भेटवस्तू दिल्या जातात. यामध्ये काहीही नाही मिळालं तरीही ठीक पण, बोनस आणि सुट्ट्या मात्र मिळायलाच हव्यात असाच अट्टहास अनेक कर्मचाऱ्यांचा असतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कंपन्यांमध्ये असणारी स्पर्धा वाढल्यामुळं कर्मचाऱ्यांकडून जास्तीच्या कामाची अपेक्षा ठेवत सुट्ट्यांमध्ये कपात केली गेल्याचं पाहायला मिळत आहे. काही कंपन्या मात्र याला अपवाद ठरत असून, कर्मचाऱ्यांचं हित त्यांचं मानसिक आरोग्य केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

अशाच कंपन्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे Meesho. जिथं इतर कंपन्या कर्मचाऱ्यांना एकाच दिवसाच्या सुट्ट्या देत आहेत तिथं मिशोकडून मात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 9 दिवसांची भरपगारी सुट्टी दिली जात आहे. ई कॉमर्स कंपनी असणाऱ्या या मिशोकडून जाहीर करण्यात आलेल्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांना हा सण त्यांच्या कुटुंबासमवेत साजरा करता यावा आणि या सणाचा आनंद घेता यावा यासाठी ही 9 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

कोणकोणत्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी? 

मिशोचे सर्वच कर्मचारी 11 ते 19 नोव्हेंबर या काळात सुट्टीवर असणार आहेत. यादरम्यानच दिवाळीचे महत्त्वाचे दिवस असून, या दिवसांमध्ये कुटुंबासमवेत खास क्षण व्यतीत करण्यासोबतच कर्मचारी एखाद्या ठिकाणी सहलीचं नियोजनही आखू शकतात. 

या मोठ्या विश्रांतीनंतर ज्यावेळी कर्मचारी जेव्हा नोकरीवर पुन्हा रुजू होतील तेव्हा त्यांच्यामध्ये द्विगुणित उत्साह असेल. या सुट्टीमध्ये कर्मचारी त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू शकतील ही महत्त्वाची बाब कंपनीकडून अधोरेखित करण्यात आली आहे. 

Related posts